लोकसत्ता टीम
नागपूर : कंपवाताच्या (पार्किंसन) आजाराचे कारण अद्यापही स्पष्ट नाही. परंतु, ८ ते १० टक्के रुग्णांमध्ये आनुवंशिक कारणाने हा आजार होत असल्याचे निरीक्षण मेंदूरोग तज्ज्ञांनी नोंदवले आहे, अशी माहिती ‘वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्यूरोलॉजी’चे विश्वस्त आणि पद्मश्री डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी दिली. गुरुवारी, ११ एप्रिलला जागतिक कंपवात दिवस असून त्यानिमित्त घेतलेला हा आढावा.
डॉ. मेश्राम म्हणाले, कंपवात हा एक मेंदूचा आजार आहे. जो मन, शरीराच्या हालचाली आणि मेंदूच्या कार्याच्या जवळजवळ सर्व बाबींवर परिणाम करतो. काही रुग्णांमध्ये पर्यावरणीय घटक, वायू प्रदूषणही या आजाराला जबाबदार राहण्याचा अंदाज आहे. परंतु भविष्यातील संशोधनातून हे जास्त स्पष्ट होईल. कंपवात आजाराचा (पार्किंसन) परिणाम सर्व वयोगटातील लोकांवर होतो. वाढत्या वयोमानासह कंपवाताचेही रुग्ण वाढत आहे. जगात सुमारे ९० लाख रुग्णांना या रोगाने ग्रासले आहे. भारतात या आजाराचे ८ ते ९ लाख रुग्ण आहे. दहा वर्षानंतर हे प्रमाण दुप्पट होईल. महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये या आजाराचे प्रमाण दीडपटीने जास्त आहे. ४० वयोगटाखालील तरुणांमध्ये हा रोग दिसून येतो. जेव्हा हा रोग ४० ते ६० वर्षे वयोगटातील लोकांना होतो तेव्हा त्याला कंपवाताचा तरुण प्रारंभ म्हणतात. आणि ४० वर्षांपेक्षा कमी वयामधे किशोर कंपवात रोग म्हणतात.
आणखी वाचा-नागपुरात बी. एस्सी. विद्यार्थिनीच्या आत्महत्या प्रकरणात २० जणांनी नोंदवली साक्ष
कंपवात आजाराची प्रारंभी लक्षणे ओळखली जात नसल्याने २५ टक्के रुग्णांचे निदान चुकीचे होते. या आजाराची कारणे स्पष्ट नाहीत. दर्जेदार ‘न्यूरोलॉजिकल’ काळजी आणि उपचारामुळे कंपवाताच्या रुग्णांचे जीवन सुधारण्याचे प्रयत्न केले जात असून या आजाराबद्दल जनजागृतीची गरज आहे. -डॉ. चंद्रशेखर मेश्राम, विश्वस्त, ‘वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्यूरोलॉजी’
लक्षणे काय?
- कंपन व शरीराच्या हालचालीतील संथपणा
- शरीराच्या एका बाजूने आजाराची सुरुवात होऊन पूर्ण शरीरावर परिणाम दिसतो
- हात, पाय कडक होतात, पाठीचा कणा वाकतो
- अचानक खाली पडण्याचे प्रकार दिसून येतात.
- लिहिताना अक्षरांचा आकार लहान होतो, अक्षर वेडेवाकडे होतात
- सहीमध्ये बदल, तोंडातून लाळ सांडते
- झोप व संज्ञानात्मक क्षमतेमध्ये व्यत्यय येतो
- वेदना, पोटाचे विकार, बद्धकोष्ठता, चिंता, नैराश्य येते व जीवनाची गुणवत्ता कमी होते.