अमरावती : दरवर्षी १९ ऑगस्ट रोजी, जागतिक छायाचित्रण दिन साजरा केला जातो. हा दिवस म्हणजे छायाचित्र आणि त्याच्या इतिहासाचा जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त उत्सव म्हणून साजरा करण्यात येतो. अमरावतीत ‘आमचे दैवत, आमचा देव्हारा, सर्व काही आमचा कॅमेरा’ असा घोष करीत सोमवारी जिल्ह्यातील छायाचित्रकारांनी शहरातून कॅमेरा दिंडी काढली. अंबानगरी फोटो-व्हिडीओग्राफर असोसिएशनच्या वतीने काढण्यात आलेल्या या दिंडीने शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले होते.
आजकाल बहुतेक लोकांना त्यांच्या आयुष्याशी संबंधित प्रत्येक अपडेट समाज माध्यमांवर शेअर करायला आवडते. अनेक जण प्रवास करताना वेगवेगळ्या ठिकाणांची सुंदर छायाचित्रे काढतात. प्रत्येकाच्या आयुष्यात छायाचित्रे खूप महत्त्वाची असतात. लोक आपला इतिहास केवळ छायाचित्रांमधूनच पाहत आले आहेत. छायाचित्रे प्रत्येकासाठी खास असतात. छायाचित्रणदिनाच्या पार्श्वभूमीवर छायाचित्रकार संघटनेने दिंडीच्या माध्यमातून कॅमेराचा सन्मान केला.
हेही वाचा – लाडक्या बहिणींच्या बाळंतपणासाठी नि:शुल्क सुविधा… माजी आमदाराने…
महापालिकेचे उपायुक्त नरेंद्र वानखडे यांच्या हस्ते पालखीत ठेवलेल्या कॅमेराचे पूजन करण्यात आले. अंबानगरी फोटो व्हिडीओग्राफर्स असोसिएशनचे अध्यक्ष राजेश वाडेकर, सचिव आकाश लादे, कोषाध्यक्ष निखिल तिवारी यावेळी उपस्थित होते. गाण्याच्या तालावर दिंडीला सुरुवात झाली.
यावेळी उपस्थित सर्व छायाचित्रकारांनी कुर्ता-पायजामा व त्यावर विविध रंगाचे फेटे परिधान केल्याने दिंडीला एक वेगळीच रंगत आली होती. दिंडीला श्री अंबा व एकविरा देवी मंदीर येथून सुरूवात झाली. जय फोटो स्टुडिओ येथे पालखीचे दलाल कुटुंबीयांनी पूजन केले. यावेळी छायाचित्रकार डीजेच्या तालावर मनमुराद थिरकले.
राजकमल चौकात शहरातील छायाचित्रकारांनी नृत्याचा ताल धरला. नंतर दिंडी जयस्तंभ चौक येथे पोहचली. या ठिकाणी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला हारार्पण करण्यात आले. त्यानंतर इर्विन चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हारार्पणानंतर दिंडीचा समारोप करण्यात आला.
हेही वाचा – मुलींना शिक्षण मोफत, तरीही शुल्क वसूलल्यास आता थेट कारवाई
प्रकल्प प्रमुख-अजिंक्य सातपुते, गजानन अंबाडकर, अक्षय इंगोले, निखिल तिवारी ,व माजी अध्यक्ष अनिल सातपुते, अनिल पडीया, विजय देवणी, मनीष जगताप, राहुल पवार, तसेच अंबानगरी फोटो व्हिडीओग्राफर्स असोसिएशनचे सर्व पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.