वर्धा : राष्ट्रीय सण तसेच अन्य विशेषप्रसंगी केंद्र व राज्य शासनातर्फे लहानमोठ्या वृत्तपत्रांना जाहिराती देण्याचा सोपस्कार पाळल्या जात असतो. मात्र आता १ ऑक्टोबरला असलेल्या विशेष दिनी परिपत्रक काढताना शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने या दिवशी वृत्तपत्रांना जाहिराती देण्याचा मुद्दा ठळकपणे अधोरेखित केला आहे.
हेही वाचा – आता ‘एसबीएससी’ प्रवर्गासही घरकूल मिळणार
या दिवशी म्हणजे १ ऑक्टोबरला जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस साजरा केल्या जातो. संविधानात ज्येष्ठ नागरिक सुस्थितीत असावा अशी तरतूद असल्याचा दाखला देत शासनाने हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला. या निमित्ताने जाहिरातीखेरीज सार्वजनिक पदयात्रा, प्रभातफेऱ्या, सभा, विशेष कार्य करणाऱ्या ज्येष्ठांचा तसेच त्यांच्यासाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचा सत्कार, आरोग्य शिबीर, योजनांची माहिती देणे, वृद्धांचे हक्क, त्यांना लागू सोयी, हेल्पलाईन आदीबाबत मार्गदर्शन करण्याचे सूचीत आहे. हा दिवस जिल्हाधिकारी तसेच सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालय, स्थानिक स्वराज्य संस्था या ठिकाणी साजरा करण्याचे निर्देश आहे.