लोकसत्ता टीम

अकोला : वाढत्या शहरीकरणामुळे चिऊताईचे दर्शन आता दुर्लभ होत चालले आहे. शहरातील १० टक्के घरांमध्ये चिमण्या दिसत सुद्धा नसल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले. हिरवळ व वृक्षांची संख्या जास्त असलेल्या भागात अधिक चिवचिवाट राहतो.

मानवाला निसर्गाशी पहिली ओळख करून देणारा पक्षी म्हणजे चिमणी. बालवयापासून चिमणीचे विशेष आकर्षण असते. सदासर्वत्र आढळणारी चिमणी दिसेनाशी का झाली? असा प्रश्न पर्यावरणप्रेमींना पडू लागला. शहरी भागासह गावांमध्ये वाढलेले काँक्रिटीकरण, स्थानिक वृक्षांची कमतरता आदी कारणामुळे चिमण्यांची संख्या घटत आहेत. या समस्यांकडे सर्वसामान्यांचे लक्ष वेधण्यासाठी निसर्गकट्टा, माध्यमिक शिक्षणाधिकारी व महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाइन चिमणी गणना केली. जिल्ह्यातील ९८० जणांनी सर्वेक्षणात भाग घेतला. अकोल्यात नियमित राबविण्यात येणारा हा उपक्रम यंदा बुलढाणा, यवतमाळ, जालना, वाशीम व नाशिक जिल्ह्यात सुद्धा सुरू झाल्याचे अमोल सावंत यांनी सांगितले.

सर्वेक्षणामध्ये १० प्रश्न विचारण्यात आले होते. गणनेत भाग घेतलेल्या ३२ टक्के नागरिकांकडे पाच ते १०, ३६.९ टक्क्यांकडे १० ते २० आणि २४ टक्के लोकांकडे ५० ते १०० चिमण्या दिसून येतात. १० टक्के लोकांकडे एकही चिमणी दिसत नाही. ३६ टक्के नागरिकांकडे बाराही महिने चिमण्या दिसतात. उन्हाळ्यात २५ टक्के, पावसाळ्यात २३ टक्के, तर हिवाळ्यात २४ टक्के लोकांना चिमणी दिसते. ८० टक्के लोकांनी चिमणीसाठी पाण्याचे भांडे व खाण्यासाठी धान्य ठेवले. ४५ टक्के जणांनी चिमणीसाठी कृत्रिम घरटे लावले.

भरपूर चिमण्या असलेल्या भागात ६२ टक्के झाडे आहेत. ५६.२ टक्के लोकांना चिमणी गणनेची माहिती विद्यार्थ्यांकडून, तर ४३ टक्के लोकांना समाज माध्यमातून मिळाली. चिमणी गणनेमध्ये राजेश्वर कॉन्व्हेंट, प्लाटिनम ज्युबिली स्कूल, समर्थ पब्लिक स्कूल, सन्मित्र स्कूल, जिजाऊ कन्या शाळा, श्री. सहदेवराव भोपळे विद्यालय, हिवरखेड, जि.प. विद्यालय, कान्हेरी सरप, जि.प. विद्यालय राजुरा घाटे, जे.आर.डी. टाटा व आर.एल.टी. विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

चिमणी संवर्धनासाठी राबविण्यात आलेल्या विशेष उपक्रमात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता. नवीन पिढी अभ्यासासोबतच चिमणी संवर्धनासाठी कृत्रिम घरटे बनवणे, पाण्याचे भांडे ठेवणे आदी करून स्वत: त्यांचे निरीक्षण करतात. ही समाधानाची बाब आहे, असे माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर यांनी सांगितले.

Story img Loader