अकोला : जगातील सर्वात प्राणघातक संसर्गजन्य आजार क्षयरोग आहे. धूम्रपान आणि तंबाखू सेवनामुळे क्षयरोग होण्याची शक्यता दुप्पट होते, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बळीराम गाढवे यांनी दिली. जनजागृती करण्यासाठी दरवर्षी २४ मार्च रोजी जागतिक क्षयरोग दिन साजरा केला जातो. या वर्षीचे क्षयरोग दिनाचे घोषवाक्य ‘होय, आपण टि.बी. निश्चित संपवू शकतो प्रतिज्ञा करा, तरतुद करा, सेवा द्या’ हे आहे. विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून क्षयरोग जनजागृती मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. क्षयरोग हा एक संसर्गजन्य आजार आहे.
‘मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस’ या जीवाणूमुळे त्याची लागण होते. प्रामुख्याने फुफ्फुसांना तो प्रभावित करतो. तो मेंदू, पाठीचा कणा आणि मूत्रपिंड या भागांवर देखील परिणाम करू शकतो. क्षयरोगाचा रुग्ण ‘बॅक्टेरिया’ असलेले थेंब बाहेर काढतो. त्यामुळे क्षयरोगाचे जीवाणू हवेतून पसरतात. गर्दीच्या वातावरणात राहणाऱ्या किंवा काम करणाऱ्या व्यक्तींना संसर्ग होऊ शकतो. दैनंदिन जीवनात वावरत असताना सार्वजनिक ठिकाणी खोकताना, शिंकताना रुमालाचा वापर करणे गरजेचे आहे, असे डॉक्टरांनी सांगितले. तीन आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकणारा सततचा खोकला, भूक न लागल्यामुळे अस्पष्ट वजन कमी होणे, सक्रिय टीबी प्रकरणांमध्ये ताप आणि रात्री घाम येणे सामान्य आहे.
फुफ्फुसांच्या जळजळीमुळे छातीत दुखणे आणि श्वास घेण्यास त्रास होणे, अत्याधिक थकवा आणि अशक्तपणा, ज्यामुळे दैनंदिन कामांवर परिणाम होतो. पाठीचा क्षयरोगामध्ये पाठदुखी आणि कडकपणा येतो. मेंदूचा संसर्ग झाल्यास तीव्र डोकेदुखी, गोंधळ आणि प्रकाशाची संवेदनशीलता आदी लक्षणे राहतात. पोटाचा क्षयरोगामध्ये वेदना, सूज आणि पचनाच्या समस्या निर्माण होतात.
क्षयरोग कोणालाही होऊ शकतो. एचआयव्ही असलेल्या लोकांमध्ये टीबी हे मृत्यूचे प्रमुख कारण आहे. केमोथेरपी किंवा अवयव प्रत्यारोपण करणारे रुग्ण, मधुमेह, मूत्रपिंडाचा आजार किंवा कर्करोग यांसारखे जुनाट आजार असलेल्या व्यक्ती, कुपोषण आणि राहणीमानाची वाईट परिस्थिती, टीबी. संक्रमित व्यक्तींशी जवळचा संपर्क, धूम्रपान आणि पदार्थांचे सेवन फुफ्फुसांच्या नुकसानीमुळे तंबाखूचे सेवन करणाऱ्यांना सक्रिय टीबी होण्याची शक्यता दुप्पट असते, असे ते म्हणाले.
उपचार अर्धवट सोडल्यास गंभीर स्वरूपाचा क्षयरोग रुग्णाला होतो. वेळेत तपासणी करून नियमित उपचार व सकस आहार घेतल्यास क्षयरोग १०० टक्के बरा होतो. क्षयरोग तपासणी , उपचार, आरोग्य शिक्षण तसेच या आजाराचा प्रतिबंध करणारी बी.सी.जी. लस (लहान मुलांना) या सेवा सर्व शासकीय रुग्णालयात तसेच आशा स्वयंसेविका, आरोग्य कर्मचारी यांचे मार्फत मोफत दिल्या जातात. लक्षणे आढळून आल्यास किंवा जोखीमग्रस्त वातावरणात राहत असल्यास तपासणीचे आवाहन केले आहे.