भंडारा : नागपूर विद्यापीठ आणि परीक्षेतील गोंधळ हे समीकरण आता फारच प्रचलित झाले आहे. नागपूर विद्यापीठाचा गलथान कारभार आज पुन्हा चव्हाट्यावर आला. ‘बॅचलर ऑफ सोशल वर्क’च्या (बीएसडब्ल्यू) परीक्षेत आज, बुधवारी झालेल्या मराठी विषयाच्या पेपरमध्ये भलतीच प्रश्नपत्रिका देण्यात आली. ही बाब विद्यार्थ्यांच्या लक्षात येताच त्यांनी परीक्षा केंद्रावर गोंधळ घातला. त्यानंतर अगदी वेळेवर दुसरी प्रश्नपत्रिका तयार करण्यात आली. मात्र, त्यातही २० ते २२ चुका होत्या. त्यामुळे विद्यार्थी संतापले. हा गंभीर प्रकार प्रगती महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर घडला.
‘बीएसडब्ल्यू’ सहाव्या सत्राच्या मराठी विषयाची परीक्षा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने सकाळी ९.३० ते १२.३० या वेळेत आयोजित केली होती. भंडारा येथील प्रगती महाविद्यालय ह्या परीक्षा केंद्रावर मराठी विषयाची प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना देताच, चुकीची प्रश्नपत्रिका हातात आल्याचे विद्यार्थ्यांच्या लक्षात आले. भलत्याच अभ्यासक्रमाची प्रश्पत्रिका हातात आल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला. त्यानंतर ती प्रश्नपत्रिका परत घेऊन वेळेवर दुसरी प्रश्नपत्रिका देण्यात आली. मात्र, त्याही प्रश्नपत्रिकेत अनेक चुका असल्याचे लक्षात आले. प्रश्न क्रमांक १ व ३ मध्ये अन्य वेगळ्या भाषेतील प्रश्न विचारले गेले. प्रश्नपत्रिकेतील भाषासुद्धा विद्यार्थ्यांना समजली नाही. एवढेच नाही तर प्रश्न पत्रिकेत एकूण २० ते २२ चुका होत्या. काही ठिकाणी हिंदी शब्दांचा वापर केला गेला. प्रश्नपत्रिकेत व्याकरणाच्याही अनेक चुका होत्या.
हेही वाचा >>> वीज प्रकल्प कोराडीतच करा, ‘प्रहार’ही मैदानात
चुकीचा पेपर दिल्याचे लक्षात येताच परीक्षा तडकाफडकी रद्द करण्यात आली. विद्यार्थ्यांनी या प्रकरणाची माहिती नागपूर विद्यापीठाचे माजी सिनेट सदस्य प्रवीण उदापुरे यांना दिली. त्यांनी ताबडतोब परीक्षा केंद्र गाठून याबाबत जाब विचारला असता सदर पेपर रद्द करण्यात आल्याचे महाविद्यालय प्रशासनाने सांगितले. यानंतर नवी प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना पावणेबारा वाजता देण्यात आली. १२ ते ३ या वेळेत परीक्षा झाली.
कारवाईची मागणी
हे प्रकरण गंभीर असून चौकशीसाठी सत्यशोधन समिती नेमून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी उदापूरे यांनी केली आहे, तर पहिली चुकीची प्रश्नपत्रिका परत घेवून ३ तास उशिराने नवी प्रश्पत्रिका देण्यात आली. मात्र मिळालेल्या प्रश्नपत्रिकेतही अनेक चुका असल्याने चुकीच्या प्रश्नांना सरसकट पूर्ण गुण देण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.