नागपूर : राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियान राबवण्याचे ठरवले असून त्यानुसार दहावी व बारावीच्या परीक्षा महसूल व पोलीस खात्याच्या देखरेखीत होणार आहेत. यंदा प्रथमच परीक्षा केंद्रांची संवेदनशील व अतिसंवेदनशील अशी वर्गवारी केली जाणार असून केंद्रालगत ५० मीटर परिसरातील झेरॉक्सची दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत.
दहावी, बारावी परीक्षेत होणाऱ्या सामूहिक कॉपीला आळा घालण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘कॉपीमुक्त अभियाना’बाबत मंगळवारी परिपत्रक जारी करण्यात आले. निवडणूक अभियानाच्या धरतीवर हे अभियान राबवले जाणार असून नोडल अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी व समन्वयक म्हणून शिक्षणाधिकाऱ्यांची (माध्यमिक) नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांसोबत जिल्हा पोलीस अधीक्षक व जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी एकत्रितपणे अभियान राबवायचे आहे. संवेदनशील व अतिसंवेदनशील केंद्रांवर परीक्षेदरम्यान चित्रीकरण केले जाईल, परिसरात जमावबंदी आदेश लागू केला जाईल तसेच ५० मीटर अंतरावरील झेरॉक्सची सर्व दुकाने बंद ठेवण्यात येतील. परीक्षेसाठी येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांची तपासणी केली जाईल.
नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी या संदर्भात सोमवारी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कॉपीमुक्त अभियानाबाबत चर्चा केली व त्याची कशी अंमलबजावणी करायची याबाबत संबधितांना सूचना देण्यात आल्या. अभियानासंदर्भात पालकांशीही चर्चा केली जाणार आहे. तसेच शिक्षक, मुख्याध्यापक आणि शिक्षण संस्थाप्रमुखांच्या बैठका घेऊन त्यांनाही याबाबत माहिती दिली जाणार आहे.
इंग्रजी, गणित, विज्ञानावर अधिक लक्ष
इंग्रजी, गणित आणि विज्ञानाचे पेपर असतील, त्या दिवशी भरारी पथक अधिक दक्ष राहणार आहे. या दिवशी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली आकस्मिक तपासणी केली जाणार असून त्यासाठी अधिकाऱ्यांनी वेळ राखून ठेवावा, असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.