नागपूर : काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दिवंगत डॉ. श्रीकांत जिचकार यांचे सुपुत्र याज्ञवल्क्य जिचकार यांची आज काँग्रेस पक्षात ‘घरवापसी’ झाली आहे. विधानसभा निवडणुकीत आघाडीच्या उमेदवाराविरोधात निवडणूक लढल्याने काँग्रेसने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. त्यांचे निलंबन मागे घेण्यात आले आहे. प्रदेश काँग्रेसच्या मुख्यालय टिळक भवन येथे एका कार्यक्रमात काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या हस्ते व प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांचे काँग्रेस परिवारत स्वागत करुन शुभेच्छा दिल्या.याज्ञवल्क्य जिचकार हे काटोल विधानसभा मतदारसंघातून इच्छुक होते. परंतु आघाडीत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)कडे गेली होती. त्यासाठी राष्ट्रवादीने माजी जिल्हा परिषद सदस्य व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे सुपुत्र सलील देशमुख यांना उमेदवारी दिली होती. त्याविरोधात याज्ञवल्क्य यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढली होती. त्यानंतर त्यांना पक्षातून सहा वर्षांकरिता निलंबित करण्यात आले होते.
विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर नाना पटोले यांच्या जागी हर्षवर्धन सपकाळ यांच्या हाती प्रदेश काँग्रेसची धुरा आली. त्यानंतर याज्ञवल्क्य जिचकार यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी संपर्क साधून पक्षात काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्याला सपकाळ यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. याज्ञवल्क्य जिचकार महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस होते. त्यांनी काटोल व भारतभर युवकांना रोजगाराशी जोडण्याचे काम केले आहे.स्वगृही परतल्याचा आनंद याज्ञवल्क्य यांनी व्यक्त केला. आपण काँग्रेस विचाराशी पाईक असून काँग्रेसची विचारधारा तरुण वर्गात रुजवण्यालाठी काम करत आहे. काँग्रेस पक्षात तरुणांचा नेतृत्वाची संधी दिली जाते आणि काँग्रेसचा विचारच देशाला तारणारा आहे. मला काँग्रेस पक्षात पुन्हा प्रवेश दिल्याबद्दल रमेश चेन्नीथला, हर्षवर्धन सपकाळ व सर्व वरिष्ठ नेत्यांचा आभार मानतो व त्यांच्या मार्दर्शनाखाली काम करेन, असे ते म्हणाले.
यावेळी काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार, विधान परिषद गटनेते सतेज उर्फ बंटी पाटील, गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खासदार प्रणिती शिंदे, खासदार प्रतिभा धानोरकर, खासदार चंद्रकांत हांडोरे, खासदार शामकुमार बर्वे, खासदार बळवंत वानखडे, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, यशोमती ठाकूर, नसीम खान, विश्वजीत कदम, हुसेन दलवाई, आमदार अमीन पटेल, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे उपस्थित होते.