नापगुरातील यश बोरकर या चिमुकल्याचे अपहरण करून खून करणाऱ्या संतोष कळवे (२०) याची फाशीची शिक्षा नागपूर उच्च न्यायालयाने रद्द करीत फाशीऐवजी जन्मठेेपेची सुधारित शिक्षा सुनावली आहे . हा निर्णय बुधवारी न्यायमूर्ती सुनील शुक्रे आणि गोवींद सानप यांनी दिला.
कुश कटारिया, युग चांडक या बालकांच्या अपहरण आणि खुनाने नागपूर शहर हादरले होते. याच मालिकेतील एक दुर्दैवी घटना म्हणजे यश बोरकर हत्याकांड होय. जिल्हा व सत्र न्यायालयात २०१८ मध्ये या बहुचर्चित हत्याकांडाच्या प्रकरणातील आरोपी संतोष काळवे याला फाशीची शिक्षा सुनावली होती. ही शिक्षा कायम करण्यासाठी हे प्रकरण उच्च न्यायालयासमक्ष सादर करण्यात आले होते. आरोपीने या शिक्षेविरुद्ध अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाने बुधवारी कायदेशिर बाबी लक्षात घेता आरोपीची फाशीची शिक्षा रद्द करीत सुधारित जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
११ जून २०१३ रोजी खापरी परिसरात यश बोरकर हत्याकांड घडले होते. संतोष काळवे याची आई आजारी होती. त्याला आईच्या उपचारासाठी आणि आपल्या शिक्षणासाठी पैशाची गरज होती. त्यामुळेच त्याने यशच्या अपहरणाची योजना आखली.
यश पाचवीचा विद्यार्थी होता. तो मित्रांसोबत खेळत असताना वडिलांनी त्याला बघितले होते. पण, सायंकाळ होऊनही यश घरी परतला नाही. रात्री १० वाजता यशच्या वडिलांना फोन आला. दोन लाख रुपये दिले नाही तर मुलाला मारण्याची धमकी फोन करणाऱ्याने दिली. अनेकांनी यशला संतोषसोबत बघितले होते. त्यामुळे पोलिसांनी संतोषची कसून चौकशी केली. अखेर त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
यशचे अपहरण केल्यानंतर संतोष त्याला घरी घेऊन गेला. सायंकाळी संतोष त्याला घेऊन मिहान परिसरात गेला. नाल्यात बुडवून दगड डोक्यात घालून त्याचा खून केला. मृतदेह दगडांच्या ढिगाऱ्याखाली लपवून तो घरी परतला. पोलिसांनी संतोषला अटक करून त्याच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते.