अमरावती : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून नेहमीच दुजाभाव केला जात असल्याचा आरोप काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी केला आहे.यशोमती ठाकूर म्हणाल्या, आमच्या मतदारसंघातही लोक राहतात त्यामुळे त्यांच्या विकासासाठी निधी आवश्यक असताना तो दिला जात नाही, पहिल्यांदाच पालकमंत्र्यांनी वारंवार पाठपुरावा केल्यानंतर आता निधी द्यायचे कबूल केले आहे, हा निधी तरी मिळावा अशी अपेक्षा आहे. रेवसा गावामध्ये पूरसंरक्षण भिंतीसाठी आम्ही सातत्याने निधी मागत आहोत. मात्र पालकमंत्र्यांकडून निधी दिला जात नाही, जर काही अनुचित घटना घडली, तर त्याला पालकमंत्री जबाबदार असतील, असा इशाराही यावेळी ठाकूर यांनी दिला.
आम्ही पालकमंत्री असताना जिल्ह्यातील रस्त्यांसाठी ४० कोटी रुपये निधी उपलब्ध करून देत होतो, मात्र आता फक्त १४ ते १५ कोटी रुपये मिळतात. वारंवार मागणी केल्यानंतर आता पहिल्यांदाच त्यांनी ३८ कोटी रुपये देतो असे सांगितले आहे. आता हे पैसे मिळाले तर निश्चितच जनतेसाठी काही कामे करता येतील. मात्र जिल्हा नियोजन समितीची बैठक ही सातत्याने होणे गरजेचे आहे. आता कितीतरी महिन्यानंतर ही बैठक झाली आहे, असे यशोमती ठाकूर म्हणाल्या.
अमरावती जिल्ह्यातील आणि मतदार संघातील विकास निधीसाठी आम्ही कसा सातत्याने पुरावा करतो याचे सर्व पुरावे आमच्याकडे आहेत. कागदपत्रे आणि फाईल यांचा ढीग जमा झाला आहे. मात्र, पालकमंत्री आम्हाला नेहमी वाटाण्याचा अक्षता लावतात. नेहमी आमच्याशी दुजाभाव केला जातो. आजही आम्ही आमचे मुद्दे मांडत असताना त्यांच्याच पक्षाच्या लोकांनी बैठकीत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. शेवटी आम्हाला जनतेचा विकासाची काळजी असून त्या पलीकडे आम्हाला काहीही राजकारणात रस नाही. मात्र सातत्याने आम्हाला डावलले जाते, तरीही आम्ही जनतेसाठी निधी मागत राहू आणि भांडत राहू, असेही यशोमती ठाकूर यावेळी म्हणाल्या….
अमरावती जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये मोदी घरकुल आवास योजना अंतर्गत सुमारे १४ हजार १७८ लाभार्थ्यांना घरकुले मंजूर करण्यात आली. मात्र, यापैकी अनेक लाभार्थ्यांना या योजनेचे हप्तेच मिळालेले नाहीत. सरकार केवळ घोषणा करीत असून प्रत्यक्षात मात्र लाभार्थ्यांना वाऱ्यावर सोडत आहे असा आरोप करीत सरकारच्या या गलथान कारभाराबाबत आता रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा देखील याआधी यशोमती ठाकूर यांनी दिला आहे.