अमरावती : संभाजी भिडे कायम वाट्टेल ते बरळतात, इतिहासाची तोडफोड करून दोन समाजात तेढ निर्माण करतात. युवकांची माथी भडकवून अराजकता निर्माण करतात. मात्र सरकार त्यांच्यावर कोणतीच कारवाई करीत नाही, त्यांना पूर्णपणे मुभा देते. संभाजी भिडेंचे बोलविता धनी कोण? आणि त्यांना अभय कुणाचे? असा प्रश्न आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला.
भिडेंनी आजवर अनेक वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. पण त्यांच्यावर कधीच कोणती कारवाई होत नाही. संभाजी भिडे नावाचे महाशय शिवप्रतिष्ठानच्या कार्यक्रमासाठी अमरावतीला आले होते. त्यावेळी त्यांनी वादग्रस्त वक्तव्ये केली, इतकेच नव्हे तर भिडे यांनी महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले. संभाजी भिडे नावाचे हे गृहस्थ कायम वादग्रस्त वक्तव्य करून समाजात विष कालविण्याचे काम करतात, युवकांची माथी भडकवितात, परंतु राज्याचे गृहमंत्री त्यांच्यावर कोणतीच कारवाई करीत नाही, याचा अर्थ काय? असा प्रश्न करून आमदार ॲड. यशोमती ठाकूर म्हणाल्या की, यापुढे जर संभाजी भिडे यांनी असे वक्तव्य केले तर त्यांना त्याच पद्धतीने प्रत्युत्तर देण्यात येईल आणि याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची असेल.
हेही वाचा – मुसळधार पावसामुळे चंद्रपूर जिल्ह्यात पूर, २० मार्ग बंद, वाहतूक खोळंबली
हेही वाचा – वर्धा : सर्पदंशाने मृत्यू! मागण्या मान्य झाल्याने आंदोलन मागे
भिडेंची जागा कारागृहात
यशोमती ठाकूर म्हणाल्या की, संभाजी भिडेंवर तातडीने कारवाई करावी. भिडेंची समाजप्रबोधन करण्याची पात्रता नाही. भिडेंची जागा कारागृहात आहे. दंगली पेटविण्याच्या दृष्टीने वादग्रस्त वक्तव्य करून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा अवमान करणाऱ्या भिडेंवर कठोर कारवाई करण्यात यावी.