अमरावती : राज्याचे महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी महाराष्ट्रातील विधवा महिलांना ‘गंगा भागिरथी’ शब्द वापरण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश प्रधान सचिवांना दिले. त्‍यावर तीव्र प्रतिक्रया उमटल्‍या असून माजी महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी याविषयी तीव्र निषेध व्‍यक्‍त केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“होय, मी गंगा-भागिरथी नाही, मी कधीही माझ्या नावासमोर तसा उल्लेख करणार नाही. हा असला काही निर्णय या राज्यात आम्ही होऊ देणार नाही. मी माझ्या पतीला गमावले. त्यांच्या अचानक निधनानंतर मी माझ्या दोन मुलांना सांभाळले, मोठे केले. मला या देशातील संविधानामुळे समानतेचा, शिक्षणाचा अधिकार मिळाला. मी आज एक स्वतंत्र व्‍यक्‍ती म्हणून जगतेय. गुलामगिरीच्या जोखडातून समस्त दलित-शोषित-वंचित आणि महिला मुक्त झाल्या. मात्र तरीही हे जोखड पुन्हा या सर्व वर्गाच्या गळ्यात बांधायचा डाव मनुवादी लोक सातत्याने करत असतात. हा घातक डाव आहे”, अशा शब्‍दात यशोमती ठाकूर यांनी आपल्‍या भावना व्‍यक्‍त केल्‍या आहेत.

हेही वाचा – वर्धा : भटक्या श्वानांच्या टोळीचा गोठ्यावर हल्ला; कालवडीचा पाडला फडशा

पुरोगामी विचारांचा ध्वज राखण्यात महाराष्ट्राने नेहमीच अग्रगण्य भूमिका निभावली आहे. जातिभेद-धर्मभेद मिटवण्यासाठी याच राज्यात आंतरजातीय – आंतरधर्मीय लग्नांचा पुरस्कार केला गेला. स्वतः डॉ. आंबेडकरांनी याचा पुरस्कार केला, वस्तुपाठ घालून दिला, त्याच राज्यात राज्याचे महिला व बालविकास मंत्री कधी गंभा, कधी आंतरजातीय-आंतरधर्मीय विवाहांवर बंदीच्या भाषा बोलतायत. हे कशा प्रकारचे सरकार आहे. या प्रतिगामी सरकारने छत्रपती शिवरायांच्या धोरणांतून फुललेला शाहू-फुले-आंबेडकर यांचा विचार संपवायचा विडा उचलला आहे, असा आरोप यशोमती ठाकूर यांनी केला आहे.

हेही वाचा – काँग्रेसमधील अंतर्गत लाथाळ्यांमुळे ओबीसी जिल्हाध्यक्षांचा राजीनामा

विधवा महिलांना आधीच अनेक कुचंबणा सहन कराव्‍या लागतात. सामाजिक परिस्थितीशी झगडा देत असताना त्यांना नवनवीन विशेषणे लावून त्यांची स्थिती बदलणार नाही. त्यांच्यासाठीच्या योजनांच्या अंमलबजावणीत अधिक सुसूत्रता आणण्यासाठी काम केले पाहिजे. गंगा-भागीरथी उल्लेखाच्या निमित्ताने विविधांगी चर्चा सुरू आहे. अशा चर्चा सुरू करून सरकार महागाई, अदानी, बेरोजगारी, शेतीचे प्रश्न, आरोग्याचे प्रश्न अशा मुलभूत प्रश्नांपासून पळण्याचा प्रयत्न करीत आहे. आम्ही संविधानाचे पाईक आहोत, गंगा-भागीरथी नाही. आम्ही जनतेच्या मुलभूत प्रश्नांसाठी लढू आणि तुमचा प्रतिगामी विचार उखडून फेकू, असे यशोमती ठाकूर यांनी म्‍हटले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yashomati thakur protested against using the word ganga bhagirathi for widows mma 73 ssb
Show comments