अमरावती : एकीकडे शेतकऱ्यांच्‍या घरात हरभरा पडून असताना दुसरीकडे ‘नाफेड’ हरभरा खरेदी बंद करण्‍याचे आदेश देते. त्‍यामुळे या ‘ईडी’ सरकारचे हे चाललंय काय? असा सवाल करीत कॉंग्रेसच्‍या आमदार व माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी तीव्र आंदोलन छेडण्‍याचा इशारा दिला आहे. यशोमती ठाकूर यांनी आज तिवसा येथील खरेदी विक्री संघाला भेट दिली, त्‍यावेळी हा प्रकार उघडकीस आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘नाफेड’च्‍या वतीने हरभरा खरेदी सुरू झाली, तेव्‍हा शेतकऱ्यांनी नोंदणीसाठी प्रचंड गर्दी केली होती. यशोमती ठाकूर यांनी यासाठी पाठपुरावा केला होता. हरभरा खरेदीचे काम सुरू असतानाच ‘नाफेड’च्‍या कार्यकारी संचालकांनी हरभरा खरेदी बंद केल्‍याचा आदेश नुकताच तिवसा येथील खरेदी विक्री संघाला प्राप्‍त झाला. या पार्श्‍वभूमिवर यशोमती ठाकूर यांनी खरेदी विक्री संघात पोहोचून भ्रमणध्‍वनीवरून वरिष्‍ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

हेही वाचा – चंद्रपूर : ‘अदानी-मोदी विरोधात बोलल्यामुळे केजरीवाल यांची चौकशी’, सरकारच्या दडपशाही विरोधात ‘आप’चा सत्याग्रह

अनेक शेतकऱ्यांच्‍या घरी अजूनही हरभरा पडून आहे. ‘नाफेड’ने हरभरा खरेदी बंद केली, तर त्‍याची विक्री कुठे करायची, हा प्रश्‍न निर्माण झाला आहे. हा शेतकऱ्यांवर अन्‍याय असून सरकार इतर कामांवर कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे, मात्र शेतकऱ्यांसाठी सरकारजवळ पैसा नाही. हरभरा खरेदी बंद करण्‍याचे मौखिक आदेश देऊन सरकारने हात वर केले आहेत. हा कुठला न्‍याय आहे, असा सवाल यशोमती ठाकूर यांनी केला आहे. सरकारचा हा निर्णय शेतकऱ्यांना अडचणीत आणणारा असून ‘नाफेड’ने हरभरा खरेदी केली नाही, तर तीव्र जनआंदोलन छेडले जाईल, असा इशारा यशोमती ठाकूर यांनी दिला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yashomati thakur reaction to nafed stop purchase of gram crop mma 73 ssb
Show comments