उद्या ४ जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. या निकालाकडे सध्या सर्वांचंच लक्ष लागलं आहे. राज्यातील प्रत्येक उमेदवार आपल्या विजयाचा विश्वास व्यक्त करताना दिसून येतोय. अशातच आता एक्झिट पोलचे अंदाजही समोर आले आहेत. यात अमरावतीतून नवनीत राणा विजयी होत असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, यासंदर्भात आता यशोमती ठाकूर यांचं एक विधान समोर आलं असून अमरावतीत इंडिया आगाडीच्या उमेदवाराचा पराभव झाल्यास गृहयुद्ध होईल, असे त्या म्हणाल्या. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगू लागल्या आहेत. आमदार रवी राणा यांनीही यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा – “कृषिमंत्र्यांना लाल आणि हिरव्या मिर्चीतील फरक तरी कळतो का?” यशोमती ठाकूर यांची बोचरी टीका; म्हणाल्या…
यशोमती ठाकूर यांनी रविवारी अमरावतीत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना अमरावतीच्या निकालाबाबत विचारण्यात आलं. यासंदर्भात बोलताना त्यांनी अमरावतीत इंडिया आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्या विजयाचा विश्वात व्यक्त केला. तसेच वानखडे यांचा पराभव झाल्यास अमरावती गृहयुद्ध होईल, असं विधानही त्यांनी केलं.
नेमकं काय म्हणाल्या यशोमती ठाकूर
“अमरावती आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणात यश मिळणार आहे. अमरावतीत इंडिया आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांचा विजय निश्चित आहे. याबाबत ज्याला जे बोलायचं ते बोलू द्या. जर अमरावतीत इंडिया आघाडीच्या उमेवादाराचा पराभव झाला, तर गृहयुद्ध होईल”, असं काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर म्हणाल्या.
रवी राणा यांनीही दिली प्रतिक्रिया
दरम्यान, त्यांच्या विधानानंतर आता आमदार रवी राणा यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. “अमरावतीतील जनता लोकशाहीच्या माध्यमातून नवनीत राणा यांना विजयी करणार आहेत. त्यामुळे काँग्रेसकडून हताश होईल महारष्ट्रात दंगे भडकवण्याचा प्रयत्न सुरू आहे. यशोमती ठाकूर यांच्या सारख्या महिला लोकप्रतिनिधी जर अशाप्रकारे धमक्या देत असतील, तर ते योग्य नाही”, असे रवी राणा म्हणाले. तसेच “महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचं राज्य आहे. पोलिसांनी तत्काळ याची दखल घेतली पाहिजे आणि यशोमती ठाकूर यांच्यावर कारवाई करत त्यांना अटक केली पाहिजे”, अशी मागणीही त्यांनी केली.