अमरावती : खासदार नवनीत राणा यांनी तिवसा येथील दहीहंडीच्या कार्यक्रमात आमदार यशोमती ठाकूर यांच्यावर पैसे घेतल्याचे आरोप केल्यानंतर त्याचे पडसाद आता उमटू लागले आहेत. नवनीत राणा यांच्या विरोधात १०० कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे यशोमती ठाकूर यांनी सांगितले आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी यशोमती ठाकूर यांनी आमदार रवी राणांकडून कडक नोटा घेतल्या, असा गंभीर आरोप खासदार नवनीत राणा यांनी केला होता. त्यामुळे यशोमती ठाकूर आक्रमक झाल्या आहेत.
हेही वाचा >>> अमरावतीत दहीहंडीचा खेळ की राजकीय नेत्यांमध्ये स्पर्धा ?
यशोमती ठाकूर यांनी नवनीत राणा यांचे सगळे आरोप फेटाळले आहेत. यावेळी त्यांनी काही प्रश्नही उपस्थित केले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या काळात जर मला पैसे दिले असतील तर त्याची माहिती निवडणूक खर्चात दिली का? एवढा मोठा दावा केला जातो, तर निवडणूक आयोग झोपा काढत आहे का? निवडणूक आयोगाने राणांवर कारवाई का केली नाही? जर नवनीत राणा एवढा मोठा दावा करत आहेत, तर ईडी, सीबीआय काय करीत आहे?, असा सवाल यशोमती ठाकूर यांनी उपस्थित केला आहे. यशोमती ठाकूर म्हणाल्या, राणा दाम्पत्याने जिल्हा नासवण्याचे काम केले आहे. त्यांचे जिल्ह्यात कुणाशीही पटत नाही. यापूर्वी त्यांनी आमदार बच्चू कडू यांच्यावर देखील आरोप केले होते. त्यानंतर त्यांनी आरोप मागे घेतले. बळवंत पाटील, प्रवीण पोटे यांच्यावरही त्यांनी खालच्या भाषेत टीका केली आहे.