यवतमाळ : अथांग समुद्र पोहून पार करायचा आहे, असे म्हटल्यास अनेकांच्या जीवाचा थरकाप उडेल. अथांग समुद्र, उंचच उंच लाटा त्यावर स्वार होत पोहत पोहत ठरवलेले ध्येय साध्य करण्यासाठी अंगी धाडसच लागते. अंगी साहस असलेली व्यक्तीच हे धाडस करू शकते. अशीच हिंमत यवतमाळ येथील अवघ्या १४ वर्षीय विद्यार्थिनीने दाखवली आहे. खळखळत्या समुद्रातील लाटांवर स्वार होत धनश्री विजय कुंडलकर हिने तब्बल ३० किमी अंतर सात तासांत पार केले. तिच्या या साहसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

गुजरात सरकारच्या युवक कल्याण महोत्सव सप्ताहांतर्गत सोमथान येथे विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. या अनुषंगाने १९ मार्च रोजी साहसी क्रीडा प्रकारात आग्री ते वेळावल दरम्यान सागरी जलतरण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. मुलांसाठी २१ नॉटीकल मैल तर मुलींसाठी १६ नॉटीकल मैल अंतराची लांब पल्ल्याची ही सागरी जलतरण स्पर्धा होती. या स्पर्धेत अथांग समुद्रात किनाऱ्यापासून २०० मीटर सुरक्षित अंतर ठेवून सागरी प्रवाह कापण्याचे लक्ष्य स्पर्धकांना देण्यात आले होते. नौदल विभागाच्या मानांकानुसार एक नॉटीकल मैल म्हणजे जमिनीवरील १.८५० किमी इतके अंतर होते.

या साहसी सागरी जलतरण स्पर्धेत यवतमाळच्या धनश्री विजय कुंडलकर या विद्यार्थिनीने सहभागी होत शहराच्या सन्मानात भर घातली. धनश्री ही येथील नंदूरकर विद्यालयात इयत्ता नववीत शिकत आहे. स्पर्धेतील मुलींसाठी निर्धारित १६ नॉटीकल मैल अंतर प्रतिकूल परिस्थितीत जिद्दीने व धाडसी प्रवृत्तीचा परिचय देत तिने सात तासांत पूर्ण केले. स्पर्धेदरम्यान आयोजकांनी जलतरणपटूंना मार्गदर्शन , पेयजल पुरवठा व सुरक्षिततेसाठी पुरविण्यात आलेल्या बोटीत धनश्रीचे मार्गदर्शक उदय कोल्हे सहभागी झाले होते.

या स्पर्धेत सहभाही होणारी धनश्री ही विदर्भातील एकमेव विद्यार्थिनी आहे, असे तिचे प्रशिक्षक उदय कोल्हे यांनी सांगितले. धनश्रीने यापूर्वी ऑक्टोबर २०२४ मध्ये बिहार राज्यातील पटणा येथे गंगी नदीच्या प्रवाहात पोहून १३ किमीचे अंतर कापले आहे. मालवण येथील सागरी जलतरण स्पर्धेतही तिले तीन किमी अंतर पार केले होते. २०२४ मध्ये मुंबई येथे महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनेच्या स्पर्धेत सनरॉक ते गेट ऑफ इंडिया हे पाच किमी अंतर तिने दोन तासात पूर्ण केले. ही सागरी जलतरण स्पर्धा अतिशय प्रतिष्ठेची मानली जाते. या स्पर्धेदरम्यान ऐनवेळी वातावरण बदलले, वाऱ्याची दिशा बदलली मात्र धनश्रीने हे आव्हान पेलत अवघ्या दोन तासांत स्पर्धेतील अंतर कापले, अशी आठवण या निमित्ताने प्रशिक्षक उदय कोल्हे यांनी सांगितली.

धनश्रीचे वडील आर्णी तालुक्यातील अंजनखेड येथे शेती करतात, तर आई गृहीणी आहे. ती यवतमाळला काकांकडे राहून शालेय शिक्षणासह जलतरण स्पर्धेचे धडे घेत आहे. तिच्या या यशाचे कौतुक होत आहे.

Story img Loader