यवतमाळ : यवतमाळसारख्या शहरात शालेय शिक्षण पूर्ण करून पुणे येथे वकिलीचे शिक्षण घेवून थेट लंडन येथील प्रसिद्ध लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स या विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त करत येथील ॲड. प्रणव विवेक देशमुख या विद्यार्थ्याने यवतमाळच्या शिरपेचात मानाच तुरा रोवला.

ॲड. प्रणव विवेक देशमुख यांनी ‘इंटरनॅशनल अँड पब्लिक पॉलिसी’ या अभ्यासक्रमाची पदवी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या प्रतिष्ठीत विद्यापीठातून प्राप्त केली. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. एरिक न्युमेयर यांच्या हस्ते प्रणव देशमुख यांना नुकतीच पदवी प्रदान करण्यात आली. या पदवीदान सोहळ्यास प्रणव यांचे आई-वडील प्रा. विवेक देशमुख आणि प्रा. प्रतिभा देशमुख यांना बोलावून लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या विद्यापीठात त्यांचाही सन्मान करण्यात आला.

हेही वाचा…कापूस उत्‍पादकांची परवड ‘सीसीआय’नेही घटवले दर…

या प्रतिष्ठीत विद्यापीठात १९२३ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘द प्रॉब्लेम ऑफ रुपी” या विषयावर पीएच.डी. प्रबंध सादर केला होता. तेथून गुणवत्ता यादीत स्थान मिळवून पदवी मिळविण्याचा कीर्तिमान अॅड. प्रणव देशमुख यांनी प्राप्‍त केला. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या विद्यापीठातून आजवर ४० पेक्षा अधिक जागतिक नेते व २० हून अधिक नोबेल पारितोषिक विजेते घडले आहेत. प्रणव यांनी ‘महाराष्ट्रातील स्वयंसेवी संस्थेच्या प्रशासनासाठी संरचनेमधील सुधारणा व कायदेशीर त्रुटीवर प्रकाश’ या विषयावर आपला प्रबंध विद्यापीठास सादर केला. यातून त्यांनी शासकीय कार्यक्षमतेचा अभाव व नियमांतील विसंगतींचे विश्लेषण करून समान स्वयंसेवी संस्थेच्या कायद्याची गरज मांडली आहे.

हेही वाचा…यवतमाळचा विद्यार्थी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत

ॲड. प्रणव यांचे शालेय शिक्षण यवतमाळमध्ये फ्री मेथाडिस्ट इंग्लिश स्कूल येथे झाले. अकरावी व बारावीचे शिक्षण अमरावती येथील विदर्भ महाविद्यालयात झाले. त्यानंतर पुणे विद्यापीठातून त्यांनी कायद्याची पदवी, तर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मुंबई येथे एलएल.एम. पूर्ण केले. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात ॲड. प्रवण यांनी विविध सामाजिक विषयांवर पीआयएल दाखल करून वंचित घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. भविष्यात धारेणनिर्मिती क्षेत्रात व महाराष्ट्रातील गरजू आणि वंचित घटकांसाठी मोफत कायदेशीर मदत करण्याचा मानस ॲड. प्रणव यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केला. ते आपल्या यशाचे श्रेय आई-वडील प्रा. विवेक व प्रा. प्रतिभा देशमुख आणि मोठे बंधू फिल्मफेअर व राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते दिग्दर्शक प्रांतिक यांना देतात.

Story img Loader