यवतमाळ – मारेगाव तालुक्यातील वनोजादेवी येथील बस थांब्याजवळ सुरू असलेले देशी, विदेशी दारूचे अवैध दुकान गावातील महिलांनीच पेटवून दिले. पोलीस, ग्रामपंचायतीला वारंवार विनंती करूनही या दुकानावर कारवाई होत नसल्याने संतप्त झालेल्या महिलांनी रविवारी सायंकाळी या दुकानात शिरून तेथील दारू व इतर साहित्य पेटवून दिले. या घटनेने खळबळ उडाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वनोजादेवी येथे बस थांब्याजवळ अवैध दारू विकली जात असल्याने गावातील अनेक कुटुंबे व्यसनाधीनतेमुळे उद्ध्वस्त झाली. त्यामुळे गावातील महिलांनी एकत्र येत हे दुकान गावातून हटवण्याची मागणी वारंवार प्रशासनाकडे केली. मात्र त्याकडे कोणीही लक्ष दिले नाही. दारू विक्रेता मुजोरी करून दारू विकत होता. रविवारी या दुकानात नेहमीपेक्षा अधिक ग्राहक होते. याची माहिती मनसेच्या महिला तालुका प्रमुख उज्वला चंदनखेडे, वनोजा येथील मनसे युवाध्यक्ष रोशन शिंदे, सीमा शिंदे, उज्ज्वला ढोके यांना मिळाली. त्यांच्या नेतृत्वात अनेक महिलांनी या दारू दुकानावर धाव घेतली. संतप्त महिला बघताच अवैध दारू विक्रेता चंद्रकांत सुधाकर भोसले (रा. नांदेपेरा, ता. वणी) हा घटनास्थळी मुद्देमाल सोडून पळून गेला. यावेळी महिलांनी देशी दारूच्या ५२ आणि विदेशी मद्याच्या सहा बॉटल ताब्यात घेत दारूच्या दुकानास आग लावली. घटनेची माहिती मारेगाव पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले. पोलिसांनी शोधमोहीम राबवून आरोपी चंद्रकांत भोसले, त्याचा सहकारी उतेश हरिश्चंद्र चांदेकर (रा. मजहरा) यांना ताब्यात घेत त्यांच्यविरोधात दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. सोबतच देशी दारूच्या ३४ बॉटलही जप्त केल्या. मारेगाव पोलीस अधिक तपास करत आहे.

हेही वाचा – नागपुरात राजकीय नेत्याच्या कारचे ‘हिट अ‍ॅण्ड रन’, पाच वाहनांना धडक

अनेक ठिकाणी अवैध दारू विक्री

वणी तालुक्यात मोठ्या प्रमाणात खनिज व्यवसाय असल्याने या परिसरात ठिकठिकाणी परप्रांतीय मजूर मोठ्या संख्येने वास्तव्यास आहे. शिवाय विविध राज्यातून वाहतूकही सुरू असते. त्यांना डोळ्यासमोर ठेवून अवैध दारू विक्रीचे गुत्ते ठिकठिकाणी उघडले आहेत. वणी, मोरगाव, झरी या तालुक्यात देशी, विदेशी दारू अवैधपणे मिळत असल्याने मजूर आदी वर्ग दारू दुकानांवर ठिय्या मांडून बसतात. त्यामुळे अनेक घरांमध्ये वाद होत आहे.

हेही वाचा – नागपूरच्या प्रसिद्ध सक्करदरा तलाव परिसर सर्वसामान्यांसाठी असुरक्षित, काय आहेत कारणे?

पोलिसांचे दुर्लक्ष

१५ दिवसांपूर्वीसुद्धा या भागात महिलांनी दारू दुकान उद्ध्वस्त केले होते. पोलीस विभाग कारवाई करत नसल्याने अशा अवैध दारू विक्रेत्यांविरोधात महिलांनीच मोहीम उघडल्याने भविष्यात अप्रिय घटना घडण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे पोलिसांनी या भागातील अवैध दारू विक्रीचे गुत्ते बंद करावे, अशी मागणी महिलांनी केली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yavatmal angry women set illegal liquor shop on fire nrp 78 ssb