यवतमाळ : विधानसभा निवडणुकीसाठी आज बुधवारी सकाळी मतदानास उत्साहात प्रारंभ झाला. मात्र काही मतदान केंद्रांवर पक्षाद्वारे उभारण्यात आलेल्या बुथवर उमेदवारांचा उघड प्रचार होत असल्याचे निदर्शनास आले. येथील ‘निर्भय बनो’ च्या सदस्यांनी यावर आक्षेप घेत निवडणूक विभागाकडे तक्रार केली. यवतमाळ शहरानजिक पिंपळगाव येथील दोनाडकर ले आऊट मधील मतदान केंद्र क्रमांक १५ जवळ १०० मिटर परिसराच्या आत भाजपच्या बुथवर हा प्रकार आज सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडला. निर्भय बनोच्या सदस्य ॲड. सीमा तेलंगे या येथे मतदान करण्यासाठी गेल्या असताना त्यांना हा प्रकार लक्षात आला.
या बुथवर काही अल्पवयीन मुलं भाजपचे उमेदवार मदन येरावार यांचे छायाचित्र असलेले मतदानाच्या आवाहनाचे पत्रक व डायरी मतदारांना देवून भाजपला मतदान करण्याचे आवाहन करत होते, अशी माहिती सीमा तेलंगे यांनी दिली. या संदर्भात त्यांनी मतदान केंद्रावर जावून केंद्र अधिकाऱ्याला १०० मिटर परिसराच्या आत राजकीय पक्षाचा बूथ कसा काय लागला, अशी विचारणा केली. तर या मतदान केंद्राबाहेर १०० मिटर परिसराची क्षेत्र रेषा आखली नसल्याचा आरोप तेलंगे यांनी केला. या प्रकाराने मतदान केंद्रावर गोंधळ उडाला. परिसरातील भाजपच्या नगरसेविकेने आपल्याजवळ असलेले ते पत्रक फाडण्याचा प्रयत्न केल्याचेही तेलंगे यांनी सांगितले. या प्रकरणी सीमा तेलंगे यांनी यवतमाळ मतदासंघांच्या निरिक्षकाकडे याप्रकरणी व्हिडिओ सादर करून तक्रार केली.
भाजपकडून असा प्रकार अन्य मतदान केंद्रावरही सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. या संदर्भात यवतमाळचे निवडणूक निर्णय अधिकारी गोपाळ देशपांडे यांना विचारणा केली असता, मतदान केंद्राजवळ असा प्रचार करणे गुन्हा आहे. या प्रकारासंदर्भात माहिती मिळाली असून झोनल ऑफिसर व भरारी पथकाला या केंद्रावर रवाना केले. त्यांच्याकडून चौकशी अहवाल आल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल. पत्रक वाटणारी मुले अल्पवयीन दिसत असल्याने हा प्रकार त्यांच्याकडून कोणी जाणीवपूर्वक करून घेतला की, त्यांनी अनवधानाने येथे येथे पत्रक वाटले, याचीही चौकशी करावी लागेल, असे देशपांडे म्हणाले. या प्रकाराने यवतमाळमध्ये खळबळ उडाली असून महाविकास आघाडीचे कार्यकर्ते अधिक दक्षतेने मतदान केंद्रांवर लक्ष ठेवून आहेत.
मोबाईल बंदीमुळे वादाचे प्रसंग
निवडणूक आयोगाने मतदान केंद्रावर मतदारांना मोबाईल घेवून जाण्यास बंदी घातली आहे. मात्र सर्वच मतदार मतदान केंद्रांवर मोबाईल घेवून येत असल्याने उपस्थित सुरक्षा कर्मचारी मोबाईल बाहेर ठेवण्याच्या सूचना करून वैतागले आहेत. वाहन घेवून न येणारे मतदार मोबाईल कुठे ठेवायचा म्हणून वाद घालत असल्याचे चित्र अनेक मतदान केंद्रांवर बघायला मिळाले. काही मतदान केंद्रांवर वाद टाळण्यासाठी मोबाईल बंद करून मतदान आत सोडले जात आहे. मोबाईल बंदीचा फटका काही ठिकाणी मतदानाच्या टक्केवारीवर होण्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान यवतमाळ जिल्ह्यात सकाळी ११ वाजेपर्यंत १९.३८ टक्के मतदान झाले होते. चार तासात वणीमध्ये सर्वाधिक २४.८८ टक्के मतदान झाले.