यवतमाळ : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत जिल्ह्यातील नोंदणीकृत सक्रिय बांधकाम कामगारांना गृहोपयोगी वस्तू संच वितरित करण्यात येत आहे. या वस्तू वितरण करतेवेळी गोंधळ होत आहे. रविवारी वणी, झरी तालुक्यातून आलेल्या असंख्य कामगारांना संचाचे वितरण न झाल्याने प्रचंड गदारोळ झाला. त्यानंतर वस्तू वाटप कार्यक्रमात सुसूत्रता आणण्यासाठी तालुकानिहाय दिवस निश्चित करण्यात आले आहे. आता कामगारांना निश्चित केलेल्या दिवशीच संच मिळणार आहे.
कामगारांना बांधकाम साहित्य पेट्या व महिलांना भांड्यांच्या संचाचे वाटप सद्यस्थितीत जिल्हास्तरावर यवतमाळ येथे प्लॉट क्रमांक ए-६३, एमआयडीसी लोहारा, येथून करण्यात येते. यासाठी महिला, कामगार पहाटेपासून रांगेत लागतात. शनिवारी मध्यरात्रीपासून वणी, झरी तालुक्यातील असंख्य महिला या गोदामासमोर रांगेत लागल्या. पाऊस, चिखल याची पर्वा न करता तासंतास उभे राहिल्यानंतर रविवारी हे गोदाम उघडलेच नाही. त्यामुळे कामगारांनी गोंधळ घातला. कामगारांची येथे गैरसोय होत असल्याचे लक्षात आल्यानंतर प्रहारचे जिल्हाध्यक्ष बिपीन चौधरी, सूरज खोब्रागडे यांनी कामगारांची व्यवस्था करून जिल्हाधिकारी कार्यालयातील कामगार विभागात मोर्चा नेला. गृहोपयोगी वस्तू संच, बांधकाम साहित्य वाटप होत असताना सुसूत्रता नसल्याने गोंधळ होत आहे. या ठिकाणी आल्यानंतर प्रशासनाकडून काहीही सहकार्य केले जात नसल्याचा आरोप कामगार महिलांनी केला. वस्तूंचे वाटप योग्य तऱ्हेने होत नाही. वादाचे प्रसंग उद्भवतात, असे येथे आलेल्या महिलांनी सांगितले.
हेही वाचा – नागपूर : प्रेयसीच्या मुलाला रेल्वेत सोडून प्रियकराचे पलायन
कामगारांच्या तक्रारी असल्याने प्रशासनाने या साहित्य वाटपात सुसूत्रता आणण्यासाठी तालुकानिहाय वेळापत्रक तयार केले. या वेळापत्रकानुसार आता संच वाटप होणार आहे. त्यामुळे बांधकाम कामगारांनी वाटपाच्या ठिकाणी गर्दी करू नये, वेळापत्रकाप्रमाणे ज्या दिवशी ज्या तालुक्याचे वाटप होणार आहे, त्याच तालुक्याच्या कामगारांनी आवश्यक कागदपत्रासह उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा कार्यकारी अधिकारी तथा सरकारी कामगार अधिकारी यांनी केले आहे. हे साहित्य वाटप निःशुल्क आहे. तरीही अनेक दलाल कामगारांना आमीष दाखवून त्यांची आर्थिक लूट करत असल्याच्या तक्रारीही होत आहे. राजकीय पक्षाचे अनेक कार्यकर्तेसुद्धा कामगारांना हे संच देण्याचे आमिष दाखवत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे त्रयस्थ व्यक्तीद्वारे दिशाभूल, फसवणूक होत असेल तर नजिकच्या पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दाखल करावी, असे आवाहन जिल्हा कार्यकारी अधिकारी तथा सरकारी कामगार अधिकारी रा.रा. काळे यांनी केले आहे.
हेही वाचा – नागपूर : कुलगुरू डॉ. चौधरींचे आज निलंबन की दिलासा! आज राज्यपालांसमोर…
असे आहे वेळापत्रक
तालुकानिहाय वेळापत्रकानुसार सोमवारी यवतमाळ तालुक्यातील कामगारांना वाटप केले जातील. मंगळवारी नेर, दारव्हा, दिग्रस तालुका, गुरुवारी बाभुळगाव, कळंब, राळेगाव तालुका, शुक्रवारी आर्णी, घाटंजी, केळापूर तालुका, शनिवारी उमरखेड, महागाव, पुसद तालुका तर रविवारी वणी, झरी जामणी व मारेगाव तालुक्यातील कामगारांना साहित्य वाटप केले जाणार आहे. या वेळापत्रकानुसार दररोज ५०० बांधकाम कामगारांना संचाचे वाटप करण्यात येणार आहे. वाटपाचे ठिकाण प्लॉट क्रमांक ए-६३, एमआयडीसी, लोहारा, यवतमाळ असून वाटपाची वेळ सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत राहणार आहे.