यवतमाळ : यवतमाळ येथील शिवशक्ती स्पोर्टस अकादमीचा खेळाडू युग संतोष झिंजे याची जर्मनीतील एफ सी बायर्न मुनिक क्लबच्या आंतरराष्ट्रीय फुटबॉल क्लबमध्ये प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे. या प्रशिक्षणासाठी तो मे महिन्यात जर्मनीला जाणार आहे. महाराष्ट्रातील १४ वर्षा आतील २० खेळाडूंमध्ये त्याचा सहभाग असणार आहे.
युग हा येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रशासन अधिकारी संतोष झिंजे यांचा मुलगा आहे. तो सध्या क्रीडा प्रबोधिनी बालेवाडी, पुणे येथे इयत्ता आठवीला शिकत आहे. त्याला बालपणापासूनच खेळाची विशेष आवड असून येथील शिवशक्ती स्पोर्टस क्लबचा तो खेडाळू आहे. जर्मनी येथील जगप्रसिद्ध एफ सी बायर्न मुनिक क्लबच्या मैदानावर निवड झालेल्या खेडाळूंना खेळण्याची संधी मिळणार आहे. तशा प्रकारचा करार महाराष्ट्र सरकारच्या खेळ व सांस्कृतिक विभाग व एफ सी बायर्न मुनिक क्लब यांच्यात झालेला आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे कोच त्यांना फुटबॉलचे प्रशिक्षण देणार आहे.
या प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या २० विद्यार्थ्यांची ‘एफ सी बायर्न महाराष्ट्र कप चॅम्पियन्स – २०२३’ या स्पर्धेतून निवड करण्यात आलेली आहे. महाराष्ट्रातील चार महसूल विभागातून फुलबॉल कप स्पर्धा घेऊन त्यात उत्कृष्ट कामगिरी करणार्या खेडाळूंची अंतिम सामन्यासाठी निवड करण्यात आली होती. अंतिम सामन्यात उत्कृष्ट कामगिरी करणार्या खेडाळूंपैकी २० खेडाळूंची या प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली. त्यात युगचा समावेश असून त्याने मिळविलेल्या यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.