यवतमाळ : देशी दारूचे दुकान हटवण्यासंदर्भात तक्रार मागे घेण्याच्या मोबदल्यात ९० हजार रुपयांची लाच स्वीकारताना मारेगाव येथील प्रभाग क्र. १३ मधील नगरसेवक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकला. अनिल उत्तम गेडाम, असे आरोपी नगरसेवकाचे नाव आहे. यवतमाळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज बुधवारी दुपारी मारेगाव-कान्हाळगाव मार्गावर ही कारवाई केली. या कारवाईने मारेगावात खळबळ उडाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मारेगाव येथील प्रभाग क्रमांक १३ मध्ये अनिल गेडाम हा विद्यमान नगरसेवक आहे. येथील प्रभागात मागील अनेक वर्षांपासून देशी दारूचे दुकान आहे. हे दुकान हटवण्यासाठी नगरसेवक गेडाम याने नगरपंचायत प्रशासनाकडे तक्रार दाखल केली होती. अर्थपूर्ण व्यवहार केल्यास ही तक्रार मागे घेऊ, असा निरोप गेडाम याने अनुज्ञप्तीधारकाकडे पाठवला होता. नगरसेवकाच्या तगाद्याने त्रस्त झालेल्या अनुज्ञप्ती धारकाने थेट अमरावती यवतमाळ येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार आज दुपारी साडेबारा वाजता कान्हाळगाव मार्गावरील देशी दारू दुकानासमोरच लाचलुचपत पथकाने सापळा रचला.

हेही वाचा – नागपूरमध्ये कॉंग्रेसचा घोळ काही संपेना, देशमुख यांचा शिक्षक भारतीला पाठिंबा

हेही वाचा – बुलढाणा : …अन् वृद्ध कलावंत उतरले पैनगंगेच्या नदीपात्रात

अनुज्ञप्तीधारकाकडून ९० हजार रुपयांची लाच स्वीकारताना नगरसेवक अनिल गेडाम याला रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई लाचलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक मारुती जगताप, अप्पर पोलीस अधीक्षक अरुण सावंत, देविदास घेवारे, पोलीस उपअधीक्षक शैलेश सपकाळ यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक विनायक कारेगावकर, ज्ञानेश्वर नालट, अब्दुल वसीम, महेश वाकोडे, सचिन भोयर, सुधीर कांबळे, राहुल गेडाम यांनी केली.