लोकसत्ता टीम

यवतमाळ : जिल्ह्यात होळी व रंगपंचमी हा सण उत्साहात साजरा करण्यात आला. रंगपंचमी खेळून काही युवक मंडळी तलावात आंघोळ करण्यासाठी गेले होते. यामध्ये दोन जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना कळंब तालुक्यातील खोरद येथील तलावात शुक्रवारी सायंकाळी घडली.

पंकज अशोकराव झाडे (३५) रा. झाडगाव तालुका राळेगाव व जयवंत पंढरी धनफुले (२८) वर्ष रा. मार्डी ता. मारेगाव अशी मृतांची नावे आहेत. पोलीस स्टेशन कळंब हद्दीतील खोरद येथील पंकज झाडे, जयंत धनफुले यांच्यासह पवन वसंतराव घोटेकर रा. झाडगाव, प्रविण अरुण भोयर रा खोरद, सागर वसंतराव घोटेकर रा. झाडगाव हे पाच जण रंगपंचमी खेळून आंघोळ करण्यासाठी तलावाकडे गेले होते. त्यापैकी पोहता येत नसल्याने दोन जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

या घटनेने तालुक्यात शोककळा पसरली आहे. जिल्ह्यात शुक्रवारी सर्वत्र होळी शांततेत पार पडली. मात्र या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.

भटक्या कुत्र्याचा बालकावर हल्ला

सायकलवर फिरत असलेल्या एका चिमुकल्यावर भटक्या कुत्र्याने हल्ला करून त्याला गंभीररीत्या जखमी केले. ही घटना वणी येथील चिखलगाव ग्रामपंचायत हद्दीतील सदाशिवनगरात घडली. श्रीदीप श्रीकांत कालर (९) असे जखमी बालकाचे नाव आहे.

श्रीदीप वणीच्या लायन्स स्कूलमधील दुसऱ्या वर्गाचा विद्यार्थी आहे. तो सायंकाळी नेहमीप्रमाणे आपल्या काही मित्रांसोबत रस्त्याने सायकलवर फिरत होता. व्यावसायिक अनिल उत्तरवार यांच्या घरासमोर एका भटक्या कुत्र्याने त्याच्यावर अचानक हल्ला चढविला. या कुत्र्याने श्रीदीपच्या शरीरावर अनेक ठिकाणी चावे घेतले. त्यामुळे तो रक्तबंबाळ झाला. या घटनेनंतर नागरिकांनी धाव घेत त्याला कुत्र्याच्या तावडीतून सोडविले. श्रीदीपला वणी येथील ग्रामीण रुग्णालयात व तेथून चंद्रपूर येथे उपचारासाठी हलविण्यात आले.

गेल्या काही महिन्यांपासून वणी शहरात भटक्या कुत्रांचा प्रचंड उपद्रव सुरू आहे. याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. हे कुत्र्यांचे टोळके गल्लीबोळात फिरत असतात. श्रीदीपला चावा घेणाऱ्या श्वानाने त्याच मार्गाने फिरत असलेल्या एका भिक्षुक महिलेवरही हल्ला केला. त्यात ही महिला गंभीर जखमी झाली. जखमी अवस्थेत महिला तेथून निघून गेली. चावा घेणारा कुत्रा अद्यापही त्याच परिसरात भटकत असल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. हा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांमध्ये खूप व्हायरल झाला आहे.