यवतमाळ : जिल्ह्यात खुनाचे सत्र थांबता थांबत नसून, सततच्या या घटनांनी जिल्हा हादरला आहे. मोठ्या भावानेच लहान भावाची हत्या केल्याची घटना खंडाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या शेंबाळपिंप्री येथे घडली. दिनेश जयवंत शिरफुले (२१) असे मृताचे नाव आहे, तर मनीष जयवंत शिरफुले (२३), दोघेही रा शेंबाळपिंप्री असे आरोपीचे नाव आहे. शुक्रवारी रात्री घडलेल्या या घटनेने शेंबाळपिंप्री येथे खळबळ उडाली आहे. या घटनेतील आरोपी फरार असून, पोलीस त्याच्या शोधात आहेत.
दिनेश व मनीष हे दोघे सख्खे भाऊ आहेत. मनीषने घेतलेली दुचाकी दिनेश दुरूस्त करून वापरत होता. सदर दुचाकीवरुन त्यांच्यात वाद होत होते. दरम्यान शुक्रवारी रात्री शेंबाळपिंप्री येथे कार्यक्रम असल्याने गावातील नागरिक कार्यक्रमाला गेले होते. अशातच रात्री ८.३० ते ९ वाजताच्या सुमारास या दोघांमध्ये वाद झाला. यावेळी झोपडपट्टी परिसरात असलेल्या घराच्या अंगणात आरोपी मनीषने दिनेशला जमिनीवर खाली पाडले. त्यानंतर फावड्याने डोक्यावर घाव घालून त्याची निर्घृण हत्या केली. लहान भावाची हत्या करुन आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. कार्यक्रमावरून कुटुंबातील अन्य सदस्य घरी परत आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. या घटनेची माहिती मिळताच खंडाळा पोलीस स्टेशनचे ठाणेदार देविदास पाटील व पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठले. पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरु आहे.
दुचाकी पुलावरून कोसळल्याने एकजण ठार
भरधाव दुचाकी पुलावरून खाली कोसळून एकजण ठार झाला. ही घटना वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या भालर येथील हनुमान मंदिराच्या बाजूला असलेल्या पुलावर शुक्रवारी सायंकाळी घडली. महादेव अमृत बहादे (५३), रा. गोकुळ नगर, वणी असे मृताचे नाव आहे. शुक्रवारी २८ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास महादेव बहादे हे आपली दुचाकी (क्र.एमएच २०, बीएन ९३०५)ने गावाकडे जात होते. अशातच भालर येथे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने ते दुचाकीसह थेट पुलाखाली कोसळले. या अपघातात महादेव बहादे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या प्रकरणी अमन महादेव बहादे यांनी वणी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरु आहे.