यवतमाळ : यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील दोन लाख ५६ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान होवून १० हजार हेक्टरवरील शेती अतिवृष्टीने खरडून गेली. जिल्ह्यातील शेतकरी पावसाच्या लहीरपणामुळे हवालदिल झाला असताना प्रशासनाने शनिवारी जाहीर केलेल्या नजर आणेवारीत जिल्ह्यातील दोन हजार ४६ गावांची पैसेवारी ६१ पैसे जाहीर केली. त्यामुळे जिल्ह्यातील पीक स्थिती उत्तम असल्याचा निष्कर्ष निघत असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याचा धोका व्यक्त होत आहे.
दरवर्षी ३० सप्टेंबरला नजर आणेवारी काढली जाते. यात ५० पैश्यांपेक्षा कमी आणेवारी निघाल्यास शेतकऱ्यांना विविध सवलती मिळतात. मात्र यावर्षीच्या खरीप हंमागात पाऊस विलंबाने आल्याने सुरुवातील पेरणी खोळंबली. त्यानंतर जुलैच्या मध्यापासून जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पावसामुळे अतिवृष्टी झाली. यात बहुतांश तालुक्यातील पिके खरडून गेली. अनेक ठिकाणी दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले. या संकटात सापडलेल्या अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचचले. सध्या शेतात असलेल्या सोयाबीन आणि कपाशीच्या पिकांवर कीड आली आहे. सोयाबीनचे पीक शेंग धरण्यापूर्वीच पिवळे पडल्याने वाळत आहे. तर कपाशीवर बोंड व गुलाबी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे.
हेही वाचा – केवळ १४ मिनिटांत बिलासपूर-नागपूर ‘वंदे भारत ट्रेन’ची स्वच्छता
शेतकरी हवालदिल असताना जिल्ह्याची पैसेवारी ६१ पैसे काढल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. जिल्हा प्रशासन व कृषी विभागाविरोधात शेतकरी चीड व्यक्त करत आहे. जिल्ह्याची पैसेवारी काढताना पालकमंत्र्यांनी आढावा घेणे आवश्यक होते. जिल्ह्यात पालकमंत्री सतत फिरत असताना त्यांना वस्तुस्थिती माहिती आहे. तरीही पैसेवारी ६१ पैसे निघाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. पालकमंत्री संजय राठोड यांचा प्रशासनावर वचक नसल्याचा हा पुरावा आहे, असा आरोप प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस देवानंद पवार यांनी केला.
डिसेंबरच्या ३१ तारखेला शासनाकडून अंतिम पीक पैसेवारी जाहीर होते. त्यावेळी जिल्ह्यातील पैसेवारीत सुधारणा करून, पैसेवारी ५० पैशांच्या खाली आल्यास शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळेल, अन्यथा यावर्षी निसर्गासह सरकारनेही शेतकऱ्यांना लाथाडले अशीच अवस्था होणार आहे.