यवतमाळ : गुन्हेगारीत तरूणांचा वाढता सहभाग हा चिंतेचा विषय आहे. यवतमाळ जिल्ह्यात कोणतेही मोठे उद्योगधंदे नसल्याने कमी वेळात अधिक पैसा कमवण्याच्या मोहात अनेक तरूण गुन्हेगारी क्षेत्रात वळत आहे. मात्र या तरूणाईस रोजगार उपलब्ध करून दिला तर ही समस्या बऱ्याच अंशी सुटू शकते, या विचारातून येथील पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी ‘ऑपरेशन प्रस्थान’ राबविले आणि शेकडो तरूणांना हक्काचा रोजगार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.
जिल्ह्यात गुन्हेगारीकडे वळणाऱ्या तरूणांना रोखण्यासाठी तसेच वावमार्गाला लागलेले, शाळा, महाविद्यालयीन शिक्षण सोडून भरकटलेल्या तरूणांना व बेरोजगारांना विविध व्यवसायिक प्रशिक्षण नि:शुल्क देवून प्रत्यक्ष रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या संकल्पनेतून ‘आपरेशन प्रस्थान’ हा उपक्रम पोलीस दलाच्या वतीने जिल्ह्यात सहा ठिकाणी राबविण्यात आला. सुरक्षा रक्षक व सुरक्षा पर्यवेक्षक या पदासाठी राबविण्यात आलेल्या ऑपरेशन प्रस्थान या बेरोजगार मेळाव्याच्या माध्यमातून तब्बल सात हजार ५२५ बेरोजगारांना रोजगार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
जिल्हा पोलीस दलाच्या वतीने गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन करण्यासाठी व युवकांना गुन्हेगारीपासुन परावृत्त करण्यासाठी ऑपरेशन प्रस्थान उपक्रम राबवण्यात येत आहे. बेरोजगार युवक, युवतींच्या हाताला काम मिळावे यासाठी १२ ते २३ फेब्रुवारी दरम्यान जिल्ह्यात यवतमाळ, पुसद, उमरखेड, पांढरकवडा, वणी आणि पुन्हा यवतमाळ या ठिकाणी पार पडलेल्या मेळाव्यांमध्ये सहा हजार ९९९ युवक आणि ५२६ युवती अशा एकूण सात हजार ५२५ बेरोजगारांनी रोजगार मिळण्यासाठी नोंदणी करत उपस्थिती लावली.
पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या प्रयत्नांतून या मेळाव्यासाठी महाराष्ट्रतील चार आणि हैद्राबाद येथील सात अशा एकूण ११ कंपन्यांनी सहभाग घेतला. या कंपन्यांनी चाचणी, मुलाखत घेतली. यातील जवळपास ५० टक्के तरूणांना या कंपन्यांनी ‘ऑफर लेटर’ दिले. उर्वरित तरूणांचीही निवड प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार आहे. या तरूणांना १८ ते २२ हजार रूपयांपर्यंत मासिक वेतन मिळणार आहे. विविध ठिकाणी या तरूणांना नोकरी करण्याची संधी देण्यात येणार आहे. ऑपरेशान प्रस्थान अंतर्गत यापूर्वी हॉटेल मॅनेजमेंटचे प्रशिक्षण देवून ८o बेरोजगार तरुण, तरुणींना विविध हॉटेलमध्ये रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
सकारात्मक काम गरजेचे
पोलीस दल नकारात्मक घटना, कारवाया निस्तारण्यात अधिक व्यस्त असतो. मात्र या दलात राहून समाजहिताचा दृष्टीकोन ठेवून सकारात्मक कामही करता येवू शकते, या उद्देशातून बेरोजगार तरूणांना रोजगार देण्यासाठी ऑपरेशन प्रस्थान उपक्रम राबविण्यात आला. भविष्यात अधिकाधिक ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ घेवून बेरोजगार तरूणांना रोजगार देण्याचा प्रयत्न आहे. तरुणाईत प्रचंड विधायक ऊर्जा आहे. ती समाजात सकारात्मकरित्या वापरली जाणे गरजेचे आहे. आम्ही पोलीस दलाच्या वतीने हा प्रयत्न करतो आहोत, अशी माहिती पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.