यवतमाळ : जिल्ह्यातील पाटणबोरी (ता. पांढरकवडा) हे गाव आंतरराज्य जुगाराचे मुख्य केंद्र बनले आहे. या गावात जुगार, मटका आदी अवैध व्यवसायांच्या माध्यमातून दररोज कोट्यवधींची उलाढाल होते. ही सर्व उलाढाल ‘सोशल क्लब’च्या नावाखाली चालते.
हे सोशल क्लब सार्वजनिक मनोरंजन केंद्र असल्याने येथे प्रत्यक्ष पैशांचा वापर करता येत नसल्याने, हे क्लब चालविणारे प्लास्टिक टोकणच्या बदल्यात खेळानंतर पैशांची देवाण-घेवाण करतात. एका प्रकरणात उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे या सोशल क्लबवर कारवाईसाठी पोलिसांचेही हात बांधले असल्याची बाब पुढे आली आहे.
हेही वाचा – नागपूर : व्हिएनआयटीतील रस्ता अखेर सुरू, पण वाहतूक कोंडी कायम
वणी ‘कोलसिटी’ म्हणून ओळखली जाते. कोळसा, चुनखडी आदी खनिजांमुळे हा भाग समृद्ध आहे. या भागात सिमेंट कंपन्या आदी उद्योग सुरू झाले. कोलमाईन्समुळे देशभरातील व्यापारी वणी, मारेगाव, मुकूटबन, झरी जामणी, सुर्दापूर, पाटणबोरी या भागात येतात. त्यांच्या मनोरंजनासाठी जागोजागी सोशल क्लब सुरू झाले. सोशल क्ल्बचा हेतू शुद्ध मनोरंजन हा आहे. या क्लबमध्ये जुगार, पत्ते, मटका असे व्यवसाय करता येत नाही. प्रत्यक्ष पैशांचा वापर करून कोणताही खेळ खेळता येत नाही. मात्र, या परिसरातील बहुतांश सोशल क्लबमध्ये जुगार खेळला जातो. या जुगारांवर पोलिसांच्या धाडीही अनेकदा पडतात. परंतु, त्यात आरोपी, वाहने आणि जुजबी रकमेशिवाय पोलिसांच्या हाती काहीही लागत नाही.
जून महिन्यात पाटणबोरी येथील जॅकपॉट मद्यालयात सुरू असलेल्या जुगारावर पोलिसांनी धाड टाकली होती. या ठिकाणाहून ३२ जुगाऱ्यांना ताब्यात घेतले. कोट्यवधींचा मटका सुरू असताना आरोपींकडून केवळ पाच लाख रुपये रोख जप्त करण्यात आले होते. नोव्हेंबर २०२३ मध्ये झरी तालुक्यातील सुर्दापूर येथे सुरू असलेल्या आंतरराज्य जुगारावर पोलिसांनी कारवाई करून २३ जुगारी आणि केवळ अडीच लाख रुपये रोकड आणि १२ वाहने जप्त केली होती. अशा जुगारांवरील धाडीत पोलिसांच्या हाती भरपूर रक्कम कधीच का लागत नाही, हा खरे तर संशोधनाचा विषय आहे.
मोठ्या धाडींमध्ये पोलिसांना वाहने आणि मोबाईलच अधिक सापडतात. जप्तीच्या कारवाईत सर्व वस्तूंची किंमत पकडली जाते आणि धाडीत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त, अशी कारवाई दाखवली जाते. प्रत्यक्षात जुजबी कारवाईनंतर या सर्व वस्तू सुपूर्दनाम्यावर परत केल्या जातात. अशा आंतरराज्य जुगारांमध्ये कोट्यवधींची उलाढाल होत असताना प्रत्यक्ष रोकड सापडत नाही, यामागे या जुगारांवर वापरण्यात येत असलेले ‘टोकण’ आहे.
हेही वाचा – ‘हे’ कारागृह दोन दिवस राहते सगळ्यांसाठी खुले, हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक
जुगार खेळण्यासाठी आलेले बहुतांश परप्रांतीय ग्राहक एकावेळी पाच ते १५ लाख रुपये सोबत आणतात. ही रक्कम अनेकदा यापेक्षाही अधिक असते. ही रक्कम जुगार चालक आधीच आपल्या ताब्यात घेतात आणि सुरक्षित ठेवतात. या बदल्यात ग्राहकांना विशिष्ट मूल्य असलेले विविध रंगांचे टोकण दिले जाते. हे टोकण हीच ग्राहकांची जुगारात खेळली जाणारी आभासी रक्कम असते. या टोकणवरच कोट्यवधींची उलाढाल होते. एखादा ग्राहक जिंकला तर टोकणच्या मूल्यानुसार त्याला जिंकलेली रक्कम दिली जाते. एखादा हारला तर टोकणच्या मूल्याची रक्कम त्याने आधीच जमा केलेल्या रक्कमेतून वजा करून उर्वरित रक्कम परत केली जाते. अशा सोशल क्लबमध्ये जुगार खेळण्यासाठी येणाऱ्यांना जिंकण्यापेक्षा पराभूत होवून रिकाम्या खिशाने परतण्याचेच अनुभव अनेकांना आले आहे.
पोलीस अधीक्षक म्हणतात…
सोशल क्लब चालविण्यासाठी शासनाचे काही नियम आहेत. सोशल क्लबचा उद्देश प्रत्यक्ष पैशांचा वापर न करता मनोरंजन हा आहे. मात्र, अनेक सोशल क्लबमध्ये टोकणच्या माध्यमातून जुगार चालविला जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आम्ही अशा क्लबवर कारवाई करून त्यांना या प्रकारे क्लब चालविण्यास मनाई केली. मात्र, एका दक्षिण भारतीय क्लब चालकाने पोलिसांच्या विरोधात जावून उच्च न्यायालयातून हा क्लब चालविण्याची परवानगी मिळवली. त्यामुळे या प्रकरणावर अधिक भाष्य करता येणार नाही. तरीही प्रत्यक्ष पैशांचा वापर करून खेळल्या जाणाऱ्या जुगार अड्ड्यांवर पोलिसांची कारवाई नियमित सुरू आहे. – डॉ. पवन बनसोड, जिल्हा पोलीस अधीक्षक, यवतमाळ</p>