वाशिम : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता तोंडावर असताना शिवसेना शिंदे गटातील विद्यमान खासदार भावना गवळी व पालकमंत्री संजय राठोड यांच्यातील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. गेल्या पाच टर्मपासून निवडून येत असलेल्या खासदार भावना गवळी यांनी आपणच प्रबळ उमेदवार असल्याचा दावा केल्यानंतरही पालकमंत्री संजय राठोड हे देखील लोकसभेची तयारी करीत असल्याने उमेदवारीवरून शिंदे गटात कलह दिसून येत आहे.
महायुतीतील अजित पवार गटाचे नेते जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, मोहिनी नाईक, भाजपकडून प्रदेश उपाध्यक्ष राजू पाटील राजे, मदन येरावार यांच्याही नावाची चर्चा रंगू लागली आहे. की ऐनवेळी नव्या चेहऱ्याला संधी दिली जाणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
यवतमाळ वाशीम लोकसभा मतदारसंघात वाशीम जिल्ह्यातील दोन तर यवतमाळ जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघ येतात. एकेकाळी हा मतदारसंघ काँग्रेसचा गड होता. परंतु मागील २५ वर्षांपासून शिवसेनेच्या खासदार भावना गवळी येथून निवडून येत आहेत. मात्र संभाव्य लोकसभा निवडणुकीपूर्वीच त्यांच्या उमेदवारीचा संभ्रम दिसून येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगमनानिमित्त लावण्यात आलेल्या बॅनरवरून शिवसेना शिंदे गटातील गटबाजी उघड झाली. तर वाशीम येथील जिल्हा क्रीडा संकुल येथे खासदार भावना गवळी यांच्या नेतृत्वात जिजाऊ, अहिल्या, सावित्री, रमाईच्या लेकींचा महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यानिमित्ताने खासदार भावना गवळी यांनी शहरभर बॅनर लावले होते. मात्र त्यामध्ये पालकमंत्री संजय राठोड यांना स्थान देण्यात आले नव्हते. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाशीम येथे आले असताना पालकमंत्री संजय राठोड यांची गैरहजेरी चर्चेचा विषय बनला आहे.
हेही वाचा – यवतमाळमध्ये शिंदे गटातच जुंपली, मंत्री संजय राठोड – खासदार भावना गवळी यांच्यात फलक युद्ध
शिवसेना शिंदे गटाच्या विद्यमान खासदार भावना गवळी यांना विरोध होत असून त्यांच्याच पक्षातील नेते संजय राठोड यांनीही लोकसभेच्या आखाड्यात उडी घेतली आहे. यासोबतच भाजपकडून राजू पाटील राजे, मदन येरावर यांच्या नावाची चर्चा होत आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, मोहिनी नाईक यांचीही नावे समोर येत आहेत. यवतमाळ वाशीम लोकसभा शिवसेना शिंदे गटाकडे राहणार ? मागील २५ वर्षांपासून निर्विवाद निवडून येणाऱ्या खासदार भावना गवळी यांना पुन्हा संधी मिळेल ? की ऐनवेळी नवखा चेहरा लोकसभेच्या मैदानात राहील. हे लवकरच स्पष्ट होईल.