यवतमाळ : विधानसभा निवडणुकीचे निकाल जसजसे पुढे येत आहे, त्यावरून यवतमाळ जिल्ह्यातही महायुतीचा वरचष्मा आहे. यवतमाळ, वणी विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीकडे तर उमरखेड, आर्णी, पुसद हे महायुतीकडे जाण्याची शक्यता आहे. राळेगाव आणि दिग्रसमध्ये काट्याची टक्कर सुरू आहे.
राज्याचे लक्ष लागलेल्या दिग्रस विधानसभा मतदारसंघात पहिल्या दोन फेरीत महाविकास आघाडी काँग्रेसचे उमेदवार माणिकराव ठाकरे हे आघाडीवर होते. मात्र तिसऱ्या फेरीपासून शिवसेना महायुतीचे उमेदवार संजय राठोड यांनी मतांची आघाडी टिकवून ठेवली आहे. संजय राठोड पाचव्यांदा आमदार होण्याच्या मार्गावर आहे. यवतमाळमध्ये पहिल्या फेरीपासूनच महाविकास आघाडी काँग्रेसचे बाळासाहेब मांगुळकर यांनी आघाडी टिकवून ठेवली आहे. महायुती भाजपचे मदन येरावार हे यावेळी विजयाच्या हॅटट्रिकपासून दूर राहू शकतात, असे सध्याचे मतमोजणीचे चित्र आहे. मात्र २०१९ मध्येही अखेरच्या फेरीत मदन येरावार विजयी झाले होते. तसाच चमत्कार यावेळीसुद्धा होईल, असा विश्वास भाजपचे कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.
हेही वाचा – राज्यात भाजपचे विजयी मार्गक्रमण पण, नागपुरातील या मतदारसंघात मात्र विभाजनाची खेळी
वणी विधानसभा मतदारसंघात कुणबी समजाबद्दल भाजप कार्यकर्त्याने केलेले वक्तव्य येथे भाजपला भोवले, असे सध्या दिसत आहे. भाजपने येथे कुणबी मतांचे विभाजन करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आल्याचे दिसत नाही. येथे महाविकास आघाडीतील शिवसेना उबाठाचे संजय देरकर हे पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर आहेत. तर महायुतीत भाजपचे संजीवरेड्डी बोदकुरवार यांना आठव्या फेरीत ३७७ मतांची आघाडी मिळाली. मात्र या फेरीपर्यंत संजय देरकर यांना ५५०० मतांची आघाडी होती.
हेही वाचा – नागपूरकरांनो सावधान ! शहराची हवा गुणवत्ता ढासळली
आर्णीमध्ये महाविकास आघाडीचे काँग्रेस उमदेवार जितेंद्र मोघे व महायुती भाजपचे राजू तोडसाम यांच्यात लढत होत असली तरी मोघे पहिल्या फेरीपासूनच माघारले आहेत. पुसद विधानसभा मतदारसंघात नाईक घराण्याची विजयाची परंपरा कायम राहणार आहे. येथे महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे इंद्रनील नाईक विजयाच्या वाटेवर आहे. येथे महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांनी मराठा मतावंर डोळा ठेवून दिलेले उमेदवार शरद मैंद यांची जादू चालली नाही. सातव्या फेरीअखेर इंद्रनील नाईक यांना ४२ हजार ३२५ मते असताना शरद मैंद यांना केवळ सहा हजार ९४० मते आहेत. पुसदमध्ये महाविकास आघाडीचा धुव्वा उडाला आहे.
उमरखेड मतदारसंघात भाजप महायुतीचे किसन वानखडे हे पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर आहे. महाविकास आघाडी काँग्रेसचे साहेबराव कांबळे यांची केवळ हवा होती, अशी चर्चा आता आहे. दोन माजी आमदार रिंगणात असूनही काहीही प्रभाव पाडू शकले नाही. मनसेकडून उभे असलेले माजी आमदार राजेंद्र नजरधने यांना त्यांच्या कलगाव या मूळगावी आतापर्यंत केवळ ११ मते मिळाली. राळेगाव विधानसभा मतदारसंघात महायुती भाजपचे प्रा. डॉ. अशोक उइके आणि महाविकास आघाडी काँग्रेसचे प्रा. वसंत पुरके यांच्यात काट्याची टक्कर सुरू आहे. तिसऱ्या फेरीअखेर उइके हे केवळ ३१ मतांनी आघाडीवर होते. त्यामुळे येथील निकाल वेगळा लागण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात उमरखेड, आर्णीमध्ये भाजप, पुसदमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), दिग्रसमध्ये शिवसेना (शिंदे), वणी (शिवसेना उबाठा), यवतमाळ (काँग्रेस) असे पक्षीय बलाबल राहू शकते. राळेगावमध्ये सध्या चित्र स्पष्ट नाही.