यवतमाळ : यवतमाळ- वाशिम लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमदेवार राजश्री हेमंत पाटील यांना विधानसभेपाठोपाठ आता लोकसभा निवडणुकीतही पराभवास सामोरे जावे लागले आहे. २०१९ मध्ये राजश्री पाटील या नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून पराभूत झाल्या होत्या. राजश्री पाटील यांच्या पराभवामुळे भाजपने निवडणुकीपूर्वी उपस्थित केलेल्या ‘इलेक्टिव मेरीट’च्या मुद्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भाजपने ‘इलेक्टिव मेरिट’च्या मुद्यावर शिवसेना शिंदे गटाचे हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील आणि यवतमाळ-वाशिमच्या खासदार भावना गवळी यांना उमदेवारी देवू नये, यासाठी दबाव आणला.
शेवटी शिवसेना (शिंदे) गटाने हिंगोलीचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांना हिंगोली लोकसभा मतदारसंघातून जाहीर केलेली महायुतीची उमेदवारी रद्द केली. यवतमाळ-वाशिममध्येही तोच कित्ता गिरवला व भावना गवळी यांना उमेदवारी दिलीच नाही. येथे हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी दिली. त्यावेळी भावना गवळी यांच्या समर्थकांनी राजश्री पाटील या नांदेड विधानसभा क्षेत्रात पराभूत झाल्या आणि त्यावेळी अनामत रक्कमही वाचवू शकल्या नव्हत्या. त्यामुळे त्यांना उमेदवारी देताना कोणते ‘इलेक्टिव मेरिट’ बघण्यात आले, असा प्रश्न उपस्थित केला होता. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हेमंत पाटील यांची नाराजी दूर करायची असल्याने राजश्री पाटील यांना शेवटच्या क्षणी उमेदवारी देण्यात आली. यवतमाळ हे राजश्री पाटील यांचे जन्मगाव आहे. त्यामुळे माहेरची जनता आपल्याला निवडून देईल, हा विश्वास राजश्री पाटील यांना पहिल्या दिवसापासून होता. शिवाय त्यांनी निवडणूक यंत्रणाही जोमाने कामाला लावली होती. त्यांनी कमी कालावधीत मोठी मजल मारली. मात्र येथील जनता, मित्र पक्षांचा विश्वास संपादन करण्यात त्यांना अपयश आल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचा – राज्यात आज पावसाचा ‘येलो अलर्ट’, पूर्व मोसमी पावसाची हजेरी
शिवाय विरोधकांनी राजश्री पाटील या बाहेरच्या उमेदवार आहेत, असा प्रचार केला आणि तो ग्रामीण भागात महाविकास आघाडीच्या पथ्यावर पडला. तसेच भाजप, मोदी आणि फडणवीस यांच्याबद्दल असलेली नाराजी मतदानातून दिसून आली. त्याचा फटकाही पाटील यांना बसला.
हेही वाचा – पहिल्याच निवडणुकीत विजयाला गवसणी! अनुप धोत्रेंनी आजोबा व वडिलांचा राजकीय वारसा जोपासला
यापूर्वी २०१९ मध्ये राजश्री पाटील यांनी दक्षिण नांदेड विधानसभा मतदारसंघात शिवसेनेकडून निवडणूक लढविली होती. मात्र त्यावेळी त्या तिसऱ्या क्रमांकावर होत्या. आता लोकसभा निवडनुकीतील पराभवामुळे राजश्री पाटील यांच्यावर त्या विधानसभा आणि लोकसभा या दोन्ही निवडणुकीत पराभूत झाल्या, असा शिक्का बसला आहे. राजश्री पाटील यांच्या पराभवामुळे हेमंत पाटील यांच्याही राजकीय महत्वाकांक्षेला खीळ बसली आहे. मात्र लोकशाहीत जय-पराजय चालतच राहणार आहे. जनमताचा कौल मान्य असून, अपयश आले तरी आपले सामाजिक काम थांबणार नाही. जनता व महायुतीतील सर्व घटकांनी विश्वास टाकल्याने काट्याची टक्कर दिली. माहेरच्या ऋणाईतच राहील, अशी प्रतीक्रिया राजश्री पाटील यांनी दिली आहे.