यवतमाळ – नापिकीमुळे हतबल झालेल्या शेतकऱ्याने २० वर्षांपूर्वी आत्महत्या केली. त्यावेळी त्याची मुलगी केवळ सहा महिन्यांची होती. आईने तिचे संगोपन करून तिला वाढवले. या कन्येचा विवाह नुकताच झाला, तेव्हा तिच्या विवाहासाठी समाजातील विविध स्तरातून मदतीचा ओघ सुरू झाला, आणि विवंचनेतील मातेला कन्येचा विवाह निर्विघ्न पार पाडण्यास मदत झाली.

पतीने आत्महत्या केल्यानंतर अत्यंत हलाखीचे जीवन जगणाऱ्या शेतकरी विधवा गीता चिंचोलकर हिच्या मुलीच्या लग्नात या सामाजिक औदार्याचे दर्शन झाले. १९९६ पासून विदर्भात दररोज आठ शेतकऱ्यांचा आत्महत्या होत आहेत. एकीकडे राजकीय पक्ष कृषी संकटाचे राजकारण करून सत्तेत येत आहेत, मात्र या संकटावर तोडगा निघत नसून आजही कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या आत्महत्या चालूच आहेत. या कृषी संकटामुळे कर्जबळी गेलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या समस्या प्रचंड प्रमाणात वाढल्या आहेत.

केळापूर तालुक्यातील कोपामांडवी येथील श्रावण चिंचोलकर यांनी ऑक्टोबर २००६ मध्ये आत्महत्या केली होती, त्यावेळी श्रावण चिंचोलकर यांची पत्नी गीता चिंचोलकर आपल्या सहा महिन्याची मुलगी लक्ष्मीसोबत एकाकी पडली. मात्र गीताने हिंमत न हारता रोजमजुरी करून मुलीचे पालनपोषण केले. मुलगी वयात आल्यानंतर तिचे लग्न ठरले, पण या कुटुंबाची आर्थिक विवंचना कायम होती. तालुक्यातील मराठवाकडी येथील तरुण शेतकरी कुणाल वाघाडे यांनी एकही पैसा व वस्तू न घेता लक्ष्मीसोबत लग्नाचा प्रस्ताव दिला. तसेच लक्ष्मीस लग्नानंतर शिकविण्याची तयारी दाखवली.

यावर्षी नापिकी, मुलीचे शिक्षण व सावकारी तसेच बचत गटाचे मायक्रो फायनान्स कर्ज यामुळे गीता चिंचोलकर अडचणीत आहे. अगदी सुरुवातीपासून या कुटुंबाच्या सोबत असलेले शेतकरी नेते किशोर तिवारी यांना चिंचोलकर परिवाराची ही आर्थिक स्थिती माहीत असल्याने त्यांनी या कुटुंबाला स्वतः मदतीचा हात देत समाजातील दानशूर व्यक्तींना मदतीचे आवाहन केले. समाजातील विविध स्तरावरून गीता चिंचोलकर यांच्या कुटुंबकरिता मदतीचे हात पुढे आले.

२० एप्रिल रोजी लक्ष्मीचा विवाह कोपमांडवी येथे संपूर्ण गावच्या आणि विशेष वऱ्हाडींच्या साक्षीने पार पडला. कोपामांडवी गावातील महिलांनी आपल्या मुलीसारखे प्रेम दाखवित लक्ष्मीला निरोप दिला.