यवतमाळ : दोन वर्षापूवी दुर्गा विसर्जन मिरवणुकीत क्षुल्लक कारणावरून दोघांनी युवकाचा खून केला होता. या घटनेत मुलाला गमावलेल्या बापाच्या मनात सुडाग्नी पेटत होता. मुलाचा मारेकरी न्यायालयाच्या तारखेसाठी शहरात आल्याची माहिती मिळताच पाठलाग करून मुलाच्या मारेकऱ्याला ठार केले.
एखाद्या थरारपटाला शोभावी अशी ही घटना शनिवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास आर्णी येथे घडली. ओम गजानन बुटले (२५), रा. आर्णी असे मृत तरुणचे नाव आहे. ओम आणि एका साथीदाराने दोन वर्षापूर्वी दुर्गादेवी विसर्जन मिरवणुकीत क्षुल्लक वादातून अजय अवधूत तिगलवाड (२२, रा.कोळवन, त. आर्णी) या युवकाचा खून केला होता. या प्रकरणी त्याला अटक झाली होती. त्यानंतर ओम १५ दिवसांपूर्वीच जामिनावर बाहेर आला होता. इकडे, एकुलत्या एका मुलाचा कुठलेही कारण नसताना ओम याने हकनाक बळी घेतल्याची खंत बाळगून अजयचे वडील अवधूत सूर्यभान तिगलवाड (५२) हे सुडाने पेटले होते. मुलाच्या मारेकऱ्याला सोडायचे नाही, या मानसिकतेतून अवधूत ओमच्या हालचालीवर लक्ष ठेवून होता. शुक्रवारी ओमची आर्णी न्यायालयात तारीख असल्याने तो आर्णी शहरात आला होता.
न्यायालयातील सुनावणी झाल्यानंतर ओम खासगी बसने पुणे येथे जाण्याच्या तयारीत होता. त्यासाठी तो सायंकाळी माहूर रोडवरील ट्रॅव्हल्स पॉईंटवर पत्नी आणि तीन वर्षीय मुलाचा बसची प्रतिक्षा करत उभा होता. याच संधीचा फायदा घेऊन, त्याच्या मागावर असलेल्या अवधूत तिगलवाड यांच्यासह तीन, चार जणांनी ओम याला घेरून त्याच्यावर तलवारीने हल्ला केला. या हल्ल्यात ओम जागेवरच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. तो ठार झाल्याचे समजून मारेकरी पळून गेले. नागरिकांनी त्याला गंभीर अवस्थेत ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथून यवतमाळ येथे हलविण्यात येत असताना वाटेतच ओमचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर पोलिसांनी काही तासांतच अवधूत तिगलवाड याला अटक केली. सोबतच इतर पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले. अवधूत सूर्यभान तिगलवाड (५२), अक्षय अवधूत तिगलवाड (२५), रवी दत्तात्रय गुंडेवाड (२३), अर्जुन मोतीराम पोयाम (२३), देवानंद सुभाष मरुडवाड (२३), उमेश प्रल्हाद काळे (२४) सर्व रा. कोळवण, ता. आर्णी अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी रजनिकांत चिलुमुला, आर्णी ठाणेदार सुनील नाईक यांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेने आर्णी येथे दहशतीचे वातावरण आहे.