यवतमाळ : यवतमाळ विधानसभा मतदारसंघातील तिसरी आघाडी प्रहार जनशक्ती पक्षाचे उमदेवार बिपीन चौधरी यांचे वाहन शुक्रवारी मध्यरात्री अज्ञातांनी पेटवून दिले. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली. यवतमाळच्या इतिहासात निवडणूक काळात या पद्धतीची घटना आजपर्यंत कधी घडली नव्हती. येथील वडगाव परिसरातील गुरूकृपा नगरीत बिपीन चौधरी यांचे वास्तव्य आहे. शुक्रवारी रात्री दीड वाजताच्या सुमारास ते, त्यांचे बंधू आणि समर्थक प्रचाराहून परतले. त्यानंतर रात्री दोन वाजताच्या सुमारास त्यांच्या शेजाऱ्यांनी फोन करून त्यांचे दुसऱ्या घरासमोर ठेवलेले चारचाकी वाहन जळत असल्याचे सांगितले.
चौधरी व त्यांच्या कुटुंबियांनी घटनास्थळी धाव घेतली तेव्हा संपूर्ण वाहन आगीच्या ज्वालानी वेढले होते. हे वाहन पंचर असल्याने दोन दिवसांपासून घरासमोर उभे होते. घटनेची माहिती तत्काळ आपतकालीन क्रमांक ११२ वर देण्यात येवून अवधूतवाडी पोलिसांना कळविण्यात आले.पोलिसांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. घटनास्थळी माचीस आढळली असून, वाहनावर पेट्रोल टाकून ते पेटवून देण्यात आल्याची शंका उमेदवार बिपीन चौधरी यांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा…‘इन्हे’ कोन नही जानता अमित शहा ‘हे’ आवाहन करण्यास विसरले
यवतमाळात निवडणूक प्रचार शिगेला पोचला असून आरोप, प्रत्यारोपांनी वातावरण ढवळून निघत आहे. महायुती आणि महाविकास आघाडीत लढत होण्याची चिन्हं असताना सर्व शाखेय कुणबी समाजाने सहविचार सभा घेवून प्रहारचे उमेदवार बिपीन चौधरी यांना समर्थन दिले. त्यात समाजातील एका गटाने अन्य उमेदवारासाठी अशीच सभा घेतली. यामुळे गेल्या काही दिवसांपासून बिपीन चौधरी यांच्यावर दबाव वाढत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या निवडणुत कुणबी समाजाचा सक्षम व तिसरा पर्याय म्हणून समाजाने व सर्वसामान्य नागरिकांनी मला पुढे केल्याने निवडणुकीतील समीकरणे बदलली आहेत. यातूनच काही राजकीय विरोधकांनी आपल्याविरूद्ध षडयंत्र रचून आपल्याला व कुटुंबाला घाबरविण्यासाठी वाहन जाळले, असा आरोप चौधरी यांनी केला.
हेही वाचा…‘महाभारताचा’ उल्लेख करत फाशीची शिक्षा, उच्च न्यायालयाचे सत्र न्यायालयावर ताशेरे…
पोलिसांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून आरोपींना शोधावे, असे ते म्हणाले. घटनेने निवडणूक लढण्याचा अधिकार सर्वांना दिला आहे. त्यामुळे कोणाच्याही दबावाला किंवा धमक्यांना आपण घाबरणार नाही. आपल्या समर्थकांनी या घटनेमुळे विचलित न होता, निवडणूक निर्भय वातावरणात पार पडतील यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन बिपीन चौधरी यांनी केले आहे. यवतमाळात निवडणूक काळात उमेदवारासंदर्भात अशी घटना पहिल्यांदाच घडल्याने विविध चर्चा सुरू आहे. मतदानाला अवघे तीन दिवस शिल्लक असताना या घटनेने शहरातील कायदा व सुव्यवस्थेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.