यवतमाळ : तब्बल दीड महिना सखोल माहिती घेत यवतमाळ पोलिसांनी झारखंड, छत्तीसगडमधील फरार नक्षल कमांडरच्या मुसक्या आवळल्या.अत्यंत गुप्तपणे केलेल्या कारवाईत अटक केलेल्या नक्षलवाद्याचे नाव तुलसी उर्फ दिलीप जेठू महतो (४७), असे आहे. पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत या कारवाईची माहिती दिली.
तुलसी उर्फ दिलीप महतो हा खोटे आधारकार्ड, वाहन चालक परवाना या कागदपत्रांच्या आधारे गेल्या २३ वर्षांपासून यवतमाळात ट्रक चालक म्हणून वास्तव्यास असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. गेल्या दोन महिन्यांपासून पोलीस तुलसी याच्यावर बारकाईने नजर ठेवून होते. तो पांढरकवडा नजीक उमरी येथील एका स्टोन क्रेशर परिसरात असल्याची खातरजमा पोलिसांनी केली. अखेर चार दिवसांपूर्वी पोलिसांनी त्याच्या यवतमाळातील लकडगंज परिसरातून मुसक्या आवळल्याचे सांगण्यात येते.
तुलसी हा १९९३ मध्ये झारखंडमधील नक्षली गटात भरती झाला होता. १९९७ मध्ये ‘भितीया दलम’ चा विभागीय कमांडर म्हणून नियुक्ती मिळाली. त्याने १२ सशस्त्र नक्षलवाद्यांचे नेतृत्व केले. सुरक्षा दलावर हल्ले, खंडणी, सरकारी मालमत्तेची तोडफोड अशा अनेक हिंसक कारवायांमध्ये त्याचा सहभाग आहे. झारखंड पोलिसांच्या नोंदीनुसार त्याच्यावर सात गंभीर गुन्हे दाखल असल्याचे माहिती पोलीस अधीक्षक चिंता यांनी दिली.
या प्रकरणी यवतमाळ पोलिसांनी झारखंड पोलिसांशी संपर्क साधून तुलसी याने दिलेला कबुलीजबाब आणि गुन्हेगारी कारवायांची पुष्टी केल्याचे चिंता म्हणाले. झारखंडमधील हजारीबाग पोलीस अधीक्षकांकडून तुलसी याच्यावरील दाखल गुन्ह्यांची पडताळणी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तुलीस महतो हा नक्षली कारवायांत सक्रिय असताना आर्थिक अपहारामुळे अडचणीत आला. त्यामुळे ठार मारले जाण्याच्या भीतीने त्याने आधी मुंबई व नंतर यवतमाळ गाठल्याचे सांगण्यात येते. येथे लकडगंज परिसरात मृत व्यक्तीच्या आधारकार्डवर स्वत:चे छायाचित्र लावून त्याने ओळखपत्र तयार केले. याच पद्धतीने त्याने वाहन चालक परवाना मिळविला.
झारखंडमध्ये त्याचे कुटुंब असताना त्याने यवतमाळातही दुसरे लग्न केल्याची माहिती आहे. या कारवाईमुळे यवतमाळ जिल्हा हा नक्षल्यांचे आश्रयस्थान असल्याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. ही कारवाईक पोलीस अधीक्षक कुमार चिंता आणि अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सतीष चवरे यांच्या नेतृत्वातील पथकाने केली.