यवतमाळ: शहरात गेल्या काही दिवसांपासून प्रमाणात दुचाकी चोरीचे सत्र सुरू आहे. शोध घेऊनही आरोपी सापडत नसल्याने पोलिसांनी अखेर स्वतःच चोरीची दुचाकी घेण्याचे ठरवले. या व्यवहारासाठी प्रयत्न सुरू केले आणि नामी शक्कल कामी येवून सावज अलगद जाळ्यात अडकले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलिसांनी स्वत: डमी ग्राहक बनून स्वस्त किमतीत दुचाकी खरेदीची युक्ती अमलात आणली. चोरीची वाहने विकणाऱ्या संशयित व्यक्तीपर्यंत दुचाकी हवी म्हणून निरोप पोहोचला. शुक्रवारी रात्री दुचाकी खरेदी-विक्रीचा व्यवहार ठरला. त्यानुसार एक तरुण दुचाकी विकण्यासाठी बसस्थानक परिसरात आला. त्याच्याशी दुचाकी व्यवहाराची बोलणी करून कागदपत्रांची मागणी करण्यात आली. तेव्हा तो युवक गडबडला अन् पोलिसांच्या तावडीत सापडला. त्याला तत्काळ ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. तेव्हा त्याने एक नव्हे, तर सहा दुचाकी चोरल्याची कबुली दिली.

हेही वाचा – नागपूर : लग्नाचे आमिष देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; गर्भवती होताच प्रियकर फरार

हेही वाचा – अजित पवार यांना केदार यांचा टोला; म्हणाले, “विधानसभा निवडणुका येऊ द्या, बारामतीमध्ये…”

अमोल श्याम देहाणे (२६, रा. शिंदे महाराज मठ लोहारा) असे आरोपीचे नाव आहे. तेथे त्याला पोलिसांनी रंगेहाथ ताब्यात घेतले. त्याने यवतमाळ अवधूतवाडी पोलीस ठाणे हद्दीतून तीन दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. तर यवतमाळ शहर ठाणे हद्दीतील एक, वर्धा येथील एक आणि अन्य ठिकाणावरून एक अशा सहा दुचाकी लंपास केल्या होत्या. अवधूतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नरेश रणधीर यांच्या मार्गदर्शनात अवधूतवाडीतील गुन्हे शोध पथकाने तपासासाठी ही वेगळी शक्कल लढविली त्यामुळे चोर हाती लागला. ही कारवाई सहायक निरीक्षक रामकृष्ण भाकडे, सहायक निरीक्षक रोहित चौधरी, सहायक फौजदार गजानन वाटमोडे, जमादार विशाल भगत, रवी खांदवे, बलराम शुक्ला, प्रशांत गेडाम, रूपेश ढोबळे, कमलेश भोयर, सागर चिरडे, रशिख शेख, महेश मांगुळकर आदींनी केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yavatmal police arrested the two wheeler thief nrp 78 ssb
Show comments