यवतमाळ – येथील एज्युकेशन सोसायटीद्वारा संचालित लोकनायक बापूजी अणे महिला महाविद्यालयातील सहायक प्राध्यापकाने धामणगाव (रेल्वे) येथे मालगाडीखाली स्वतःला झोकून देत आत्महत्या केली. संतोष गोरे (५६) रा. सृष्टी अपार्टमेंट, दारव्हा रोड असे मृत प्राध्यापकाचे नाव आहे. आज सोमवारी पहाटे अडीच वाजता ही घटना घडली. त्यांच्या आत्महत्येने शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
प्रा. संतोष गोरे हे येथील लोकनायक बापूजी अणे महिला महाविद्यालयात इंग्रजी विषयाचे सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. महाविद्यालयातीलच एका महिला सहकाऱ्याच्या तक्रारीवरून त्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. गेल्या काही दिवसांपासून ते तणावात असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. शनिवारी ते नेहमीप्रमाणे महाविद्यालयात होते. रविवारी महाविद्यालयालास सुट्टी असल्याने त्यांची कोण्या सहकाऱ्यांशी भेट झाली नव्हती. त्यांची पत्नी बाहेरगावी गेली असल्याने घरी ते एकटेच होते. सोमवारी पहाटेच प्रा. गोरे यांनी आत्महत्या केल्याची बातमी यवतमाळात धडकली, तेव्हा महाविद्यालय क्षेत्रात खळबळ उडाली. संस्थेने महाविद्यालयास सुट्टी दिली व बहुतांश प्राध्यापक धामगणाव येथे रवाना झाले.
रात्री धामणगाव येथे पोहोचल्यानंतर त्यांनी रेल्वे स्टेशन परिसरात बराच वेळ घालवल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास एका धावत्या मालगाडीखाली झोकून देत आत्महत्या केली. यात त्यांचा देह छिन्नविछिन्न झाला होता. त्यांच्या खिशात मृत्यूपूर्व चिठ्ठी सापडली आहे. या चिठ्ठीत त्यांनी त्यांचा मानसिक छळ होत असल्याचे म्हटले आहे. महाविद्यालयाशी संबंधित ३४ जणांची नावे या चिठ्ठीत असल्याची चर्चा शैक्षणिक वर्तुळात आहे. त्यामुळे महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी आदी तणावात आहे. प्रा. संतोष गोरे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी असा परिवार आहे.
नोकरीचा राजीनामाही दिला होता
प्रा. संतोष गोरे यांच्याबद्दल वरिष्ठ महाविद्यालयातील एका महिला प्राध्यापिकेने प्राचार्यांकडे तक्रार केली होती. या तक्रारीनंतर प्रा. गोरे यांनी प्राचार्यांकडे आपला नोकरीचा राजीनामा दिल्याची माहिती आहे. मात्र प्राचार्यांनी त्यांची समजूत घातल्याचे समजते. महाविद्यालयातील महिला तक्रार निवारण समितीकडे शुक्रवारी त्यांचे प्रकरण चौकशीसाठी आले. शनिवारी समितीने संबंधित तक्रारदार आणि प्रा. गोरे यांना समक्ष बसवून समज देत प्रकरण सामंजस्याने मिटविले होते, अशी माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली. त्यानंतर शनिवारी प्रा. गोरे जरा रिलॅक्स होवून घरी परत गेल्याचे सांगण्यात येते. या संदर्भात महाविद्यालयाचे प्राचार्य दुर्गेश कुंटे यांना विचारणा केली असता, प्रा. संतोष गोरे यांच्या आत्महत्या प्रकरणाशी महाविद्यालयाचा कुठलाही संबंध नसल्याचे सांगितले. महिला प्राध्यापकाच्या तक्रारीचा विषय संपला असताना त्यांनी हे पाऊल का उचलले हे पोलीस चौकशीत स्पष्ट होईल. मात्र त्यांनी असा टोकाचा निर्णय घ्यायला नको होता, असे प्राचार्य कुंटे म्हणाले.