यवतमाळ : येथील प्रशासकिय इमारतीत असलेल्या जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या कक्षात एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याने कांत्राटाचे बिल मिळत नसल्याने विष घेवून आत्महत्येचा प्रयत्न केला. अश्वजीत शेळके, असे विष प्राशन करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सोमवारी सायंकाळी उशिरा घडलेल्या या प्रकाराने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अश्वजीत शेळके हे आरपीआय आठवले गटाचे युवा जिल्हाध्यक्ष आहेत. पुरवठा विभागाने गोदाम हमाल कंत्राटदाराचे दोन महिन्यांचे जवळपास साडेसहा लाख रुपयांचे देयक दिले नसल्याचा आरोप करत तरुणाने हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येते. शासकीय धान्य गोदामातील हमालीचा कंत्राट देवानंद शेळके यांच्याकडे आहे. त्यांना नोव्हेंबर २०२३ पासून हे कंत्राट देण्यात आले आहे. मात्र त्यांनी बोगस कागदपत्रे जोडून कंत्राट घेतल्याची तक्रार प्रशासनाकडे आली. त्यात तथ्य आढळल्यानंतर हे कंत्राट रद्द करण्यात आले आहे. देवानंद शेळके यांचे सप्टेंबर ते ऑक्टोबरमधील देयक पुरवठा अधिकार्‍यांकडे प्रलंबित आहे. सोमवारी देवानंद शेळके यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार यांची त्यांच्या दालनात भेट घेतली. पवार यांनी हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने, ही सुनावणी पूर्ण होताच प्रलंबित देयक काढण्यासंदर्भात निर्णय होणार असल्याचे सांगितले. या चर्चेनंतर देवानंद शेळके पुरवठा अधिकाऱ्यांच्या कक्षातून बाहेर गेले. त्यानंतर काही वेळात ते आपल्या दोन मुलांसह पुन्हा कार्यालयात आले. यावेळी काही अभ्यागत कक्षात बसून होते. या ठिकाणी देवानंद शेळके यांनी पुरवठा अधिकाऱ्यांशी देयकावरून वाद घातला. यावेळी उपस्थित असलेल्या त्यांचा मुलगा अश्वजीत शेळके याने देयक न काढल्यास विष प्राशन करून आत्महत्या करण्याची धमकी दिली.

हेही वाचा – एका लग्नाची दुसरी गोष्ट! निवृत्तीच्या वयात १४ जोडपी अडकली विवाहबंधनात

पुरवठा अधिकारी पवार हे त्याला समजावत असतानाच त्याने खिशातून विषाची बाटली काढून विष प्राशन केले. ही बाब लक्षात येताच कक्षात बसून असलेल्या दिगंबर पाटील व पुरवठा अधिकारी सुधाकर पवार यांनी शेळके यांना अडविण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत बाटलीतील विष पवार यांच्या शर्टवर आणि कक्षातही संडले. घटनेनंतर शेळके यांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी पुरवठा विभागात धाव घेत तपासणी केली.

हेही वाचा – अकोला : स्वयंसेवी संस्थांसाठी महत्त्वाचे! ‘धर्मादाय’ संकेतस्थळाच्या संथगतीचा…

या कांत्राटानंतर आम्ही मजुरांचे संपूर्ण पैसे दिले आहेत. मात्र आमचे देयक काढण्यासाठी पुरवठा विभागाकडून प्रचंड त्रास होत असल्याने आपल्या भावाने वैतागून विष प्राशन केले, अशी प्रतिक्रिया या घटनेनंतर अश्वजीत याचा भाऊ आशीष शेळके यांनी दिली. या संदर्भात जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार यांना विचारणा केली असता, देवानंद शेळके यांच्या कंत्राटाबद्दल आलेल्या तक्रारीनंतर त्यांचे कंत्राट रद्द करण्यात आले आहे. त्यांनी यासंदर्भात विभागीय आयुक्तांकडे अपील केले असून प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. आयुक्तांच्या निर्णयानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे. शेळके यांनी सोमवारी आपली भेट घेतली. त्यानंतर ते गेले व मुलासोबत परत येवून वाद घातला. यावेळी त्यांच्या मुलाने विष प्राशन करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले असून, पोलिसांनाही रीतसर तक्रार दिल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार यांनी सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yavatmal rpi district president suicide attempt in government office nrp 78 ssb