यवतमाळ : येथील नैसर्गिक शेतीचे पुरस्कर्ते, प्रशिक्षक, चिकित्सक आणि दीनदयाल सेवा प्रतिष्ठान संचालित दीनदयाल प्रबोधिनीचे अध्यक्ष सुभाष शर्मा यांना भारत सरकारचा प्रतिष्ठित ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाला आहे. सुभाष शर्मा यांच्या रूपाने यवतमाळ जिल्ह्याला प्रथमच पद्मश्री हा सन्मान प्राप्त झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुभाष शर्मा हे गेल्या तीस वर्षांपासून नैसर्गिक शेती करीत असून शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचे प्रशिक्षण देत आहेत. देशभरात हजारो शेतकरी त्यांच्या प्रेरणेने विषमुक्त नैसर्गिक शेती करीत आहेत. यवतमाळ जवळच्या तिवसा येथील त्यांची २० एकर शेती एक प्रकारे नैसर्गिक शेतीची प्रयोगशाळाच आहे. या शेतीमध्ये त्यांनी रासायनिक खते किंवा कीटकनाशके यांचा वापर न करता केवळ देशी गायीचे शेण, गोमूत्र आणि इतर नैसर्गिक निविष्ठांचा वापर करून शास्त्रशुद्ध पद्धतीने भरघोस उत्पादन घेण्याची किमया साधली आहे. त्यांच्या शेतात आजपर्यंत लाखो शेतकऱ्यांनी भेटी देऊन प्रशिक्षण घेतले आहे. सुभाष शर्मा यांची भारतातील अनेक कृषी विद्यापीठांमध्ये व्याख्याने देखील झाली आहेत.

सुभाष शर्मा यांच्या शेतीविषयक प्रयोगांना हरित क्रांतीचे जनक भारतरत्न डॉ. स्वामिनाथन, भारत सरकारचे अतिरिक्त सचिव पी. डी. मिश्रा, नाबार्डचे अध्यक्ष उमेशचंद्र सारंगी, महाराष्ट्राचे कृषी सचिव सुधीरकुमार गोयल, समाजसेवक अण्णा हजारे, रा. स्व. संघाचे तत्कालीन सरकार्यवाह भय्याजी जोशी, आफ्रिकेचे राजदूत असदाक के, इंडियन ऑरगॅनिक असोसिएशनचे क्लाउड अल्वारीस यांच्यासह देश विदेशातील अनेक तज्ज्ञ मंडळी आणि मान्यवरांनी भेट दिली आहे. त्यांच्या या अलौकीक कार्याबद्दल त्यांना महाराष्ट्र शासनाचा ‘कृषिभूषण’ पुरस्कार, अग्रोवनचा ‘स्मार्ट शेतकरी’ अवॉर्ड, दीनदयाल सेवा प्रतिष्ठानचा ‘पंडित दीनदयाल उपाध्याय सेवा पुरस्कार’ आदी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनी गाजलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील सुभाष शर्मांसारख्या कृषी चिंतकास पद्मश्री या प्रतिष्ठित पुरस्कार घोषित करून भारत सरकारने योग्य सन्मान केल्याची भावना कृषी क्षेत्रातील मान्यवर व्यक्त करीत आहेत. राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते अशा सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी सुभाष शर्मा यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले असून शेतकरी वर्गाने भारत सरकारच्या या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला आहे.

तिन्ही पद्म पुरस्कारांवर यवतमाळकरांची मोहोर

नैसर्गिक शेती तज्ञ सुभाष शर्मा यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्यामुळे भारत सरकारच्या तिन्ही पद्म पुरस्कारांवर यवतमाळकरांनी मोहोर उमटवली आहे. यापूर्वी ज्येष्ठ राजकारणी, स्वातंत्र्य सेनानी लोकनायक बापूजी अणे उपाख्य माधव श्रीहरी अणे यांना भारत सरकारने ‘पद्म विभूषण’ पुरस्काराने सन्मानित केले आहे. तसेच कळंबचे सुपुत्र, ज्येष्ठ संशोधक, शास्त्रज्ञ वामन(दादा) बापूजी मेत्रे यांचाही ‘पद्म भूषण’ देवून भारत सरकारने गौरव केला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yavatmal s subhash sharma padma shri award for his contribution in natural farming nrp 78 css