यवतमाळ : यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीत चुरशीची लढत झाली. उद्या मंगळवारी मतमोजणी होणार असून, दोन्ही उमेदवारांनी विजयाचे दावे केले आहेत. येथे शिवसेना विरद्ध शिवसेना अशीच थेट लढत झाली. शिवसेना शिंदे गटाच्या महायुतीच्या उमेदवार राजश्री हेमंत पाटील आणि शिवसेना उबाठा गटाचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख यांच्यापैकी एकाच्या गळ्यात विजयाची माळ पडणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात १२ लाख २० हजार १८९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. २०१९ पेक्षा यावेळी मतदानाचा टक्का वाढला. त्यातही महिला व नव मतदारांच्या मतदानाचे प्रमाण अधिक आहे. यावेळी यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून महायुतीच १०१ टक्के विजयी होईल, असा विश्वास महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांनी व्यक्त केला.

हेही वाचा – पुन्हा प्रचंड मताधिक्याने विजयी होणार….. सुनील मेंढेंचा दावा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी बसविण्यासाठी नागरिकांनी उत्स्फुर्तपणे मतदान केले. महिला मतदारांचा आपल्याला मोठा पाठींबा मिळाला. नवमतदार सोबत होते. शिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनसामान्यांसाठी राबविलेल्या योजनांचा आपल्याला फायदा झाला. त्यामुळे आपण किमान ५० हजारांपेक्षा अधिक मतांनी निवडून येवू, असा विश्वास राजश्री पाटील यांनी व्यक्त केला. एक्झीट पोलमध्ये यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा विजय दाखवत आहे.

याबाबत बोलताना, एक्झीट पोल हे निवडक लोकांची मते जाणून ठरविले जातात. खरा निर्णय जनताच घेते आणि मंगळवारी आपला विजय निश्चित आहे, असे राजश्री पाटील म्हणाल्या.

हेही वाचा – वर्धा : रामदास तडस व अमर काळे म्हणतात, ‘विजयाचा गुलाल मीच उधळणार…’

यवतमाळ – वाशिम लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे संजय देशमुख विजयी होतील, असा अंदाज एक्झीट पोलमध्ये वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे. अनेक उत्साही कार्यकर्त्यांनी जिल्ह्यात संजय देशमुख यांच्या विजयाचे फलकही लावले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल शेतकरी, सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांची शेतकऱ्यांमध्ये चीड आहे. शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल जनमानसात असलेली सहानुभूतीची लाट, मुहायुतीने लादलेला बाहेरचा उमदेवार आणि आपला राजकीय पूर्वानुभव या सर्वांची उपलब्धी म्हणजे आपला बहुमताने विजय निश्चित आहे, असा दावा महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख यांनी केला आहे. दरम्यान यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी मंगळवारी यवतमाळ येथील दारव्हा मार्गावरील शासकीय धान्य गोदामात होणार आहे. सहा विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी सहा सभागृहात एकूण ८४ टेबलवर होणार आहे. २५ ते ३० फेऱ्यांमध्ये मतमोजणी पूर्ण होवून दुपारी ३ वाजेपर्यंत अंतिम निकाल हाती येण्याची शक्यता आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yavatmal shivsena shinde vs shivsena thackeray faction claims of victory strengthened by exit polls nrp 78 ssb
Show comments