यवतमाळ : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे संवैधानिकरित्या आंदोलन करीत असलेल्या मराठा आंदोलकांवर पोलिसांनी अमानुष लाठीमार केला. या घटनेस राज्याचे गृहमंत्री जबाबदार असल्याचा आरोप करीत शासन व पोलीस प्रशासनाच्या निषेधार्थ यवतमाळ येथे आज, मंगळवारी सकाळपासून मराठा-कुणबी मोर्चाने बंद पुकारला आहे. या बंदला काही ठिकाणी हिंसक वळण लागले. आंदोलकांनी एका दुकानावर दगडफेक केली, तर विविध चौकांत टायर जाळून निषेध नोंदवण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शहरात सकाळी १० नंतर बंदची तीव्रता वाढली. आंदोलकांनी शहरात फिरून व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. यावेळी पोस्टल ग्राउंड परिसरातील हल्दीरामच्या दुकानावर दगडफेक करण्यात आली. यामुळे खळबळ उडाली. या घटनेत दुकानाच्या दर्शनी भागातील काचा फुटल्या. पोलिसांनी घटनास्थळी पोलीस बंदोबस्त लावला. यासोबतच शहरातील विविध चौकांत टायर पेटवून घटनेचा निषेध नोंदविण्यात आला.

हेही वाचा – उपराजधानीत गुन्हेगारांवर नियंत्रण, तरी गुन्हेगारी अनियंत्रित! पोलीस आयुक्तांचा तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण

हेही वाचा – “माजी गृहमंत्र्यांची नार्को टेस्ट करा” भाजप नेते आशिष देशमुख यांची मागणी; म्हणाले, “शरद पवारांच्या सांगण्यावरून…’

शहरातील नागपूर-तुळजापूर महामार्गावर वनवासी मारोती चौकात चक्काजाम आंदोलन करून टायर जाळण्यात आले. आग विझविण्यासाठी अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले होते. या घटनेने शहरात येणारी वाहतूक विस्कळीत झाली. शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता अन्य व्यापारपेठ सध्या बंद आहे. बंदच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाने अनेक मार्गांवरील बसफेऱ्या रद्द केल्याने प्रवाशांचे हाल होत आहे. बंददरम्यान कुठेही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिसांनी सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवला असून अनेक वरीष्ठ पोलीस अधिकारी रस्त्यावर उतरले आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yavatmal shutdown turns violent stone pelting on shops protest by burning tires nrp 78 ssb
Show comments