पांढरकवड्यातील टी- १ वाघिणीच्या प्रकरणात अखेर पशुवैद्यकांची ‘युरिन थेरपी’ कामी आली असून वनखात्याचे अधिकारी आणि गावकऱ्यांना तिचे प्रत्यक्ष दर्शन झाले. यामुळे येत्या काही दिवसातच ती जेरबंद होण्याची शक्यता बळावली आहे. २०१० साली नागपुरातील एका पशुवैद्यकीय अधिकाऱ्याने याच युक्तीचा वापर करून वाघिणीला जेरबंद केले होते.
एका महिन्यापासून सुरू असलेल्या टी-१ वाघिणीला जेरबंद करण्याच्या मोहिमेतील वनखात्याचे सर्व पर्याय अयशस्वी ठरले होते. त्यानंतर डेहराडूनच्या भारतीय वन्यजीव संस्थेने सुचवलेल्या ‘केल्विन क्लेन’ या रसायनाच्या पर्यायाला थोडेफार यश आले. कॅमेरा ट्रॅपमध्ये त्या वाघिणीचे छायाचित्र आले. मात्र, अशी प्रकरणे यशस्वीरित्या हाताळणाऱ्या नागपुरातील पशुवैद्यकीय अधिकाऱ्याने सुचवलेल्या ‘युरिन थेरपी’ पर्यायाचा सकारात्मक परिणाम दिसून आला. कॅमेरा ट्रॅपमध्ये दिसणारी वाघीण आज, रविवारी सकाळी वनखात्याच्या कर्मचाऱ्यांना तसेच गावकऱ्यांना दिसली. तब्बल चार ते पाच मिनिटे ती वाघीण एकाच ठिकाणी होती. त्यामुळे तिला जेरबंद करण्याची शक्यता बळावली आहे. एप्रिल २०१० मध्ये नागपूरपासून ६० किलोमीटर अंतरावरील रानमांगली गावाजवळ वाघीण आणि तिच्या दोन बछड्यांमुळे अशीच दहशत पसरली होती. या वाघिणीने एका महिलेचा बळी देखील घेतला होता. त्यानंतर महाराजबाग प्राणिसंग्रहालयाचे प्रभारी डॉ. सुनील बावस्कर यांनी तत्कालीन उपवनसंरक्षक डॉ. रामबाबू यांना ‘युरिन थेरपी’चा पर्याय सुचवला. या प्राणिसंग्रहालयात चंद्रपूरवरून जेरबंद करून आणलेला वाघ होता. त्या वाघाची २५० मि.लि. लघवी एका बाटलीत भरून ती वाघिणीचा अधिवास असणाऱ्या परिसरात शिंपडण्यात आली. त्याचा परिणाम म्हणजे त्या वाघिणीने नंतर गावाची सीमा कधीच ओलांडली नाही आणि जंगलात परत गेली. त्यामुळे या प्रकरणात देखील या पर्यायाचा वापर करून तिला जेरबंद करता येऊ शकते. शनिवारी, सायंकाळी वापरलेल्या या युक्तीचा परिणाम आज, रविवारी सकाळी आठ वाजताच दिसून आला. त्यामुळे वनखात्याचे अधिकारी आता काय निर्णय घेतात, यावर सारे काही अवलंबून आहे. दरम्यान, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांनी या प्रयोगास दुजोरा दिला.