यवतमाळ : कायम दुःखच वाट्याला येत असतील तर जीवनही नकोसे वाटते. दोन बहिणींच्या वाट्याला असाच वनवास आला. सधन कुटुंबातील असूनही नातलगांनी दूर सारले. शरीरात बळ असेपर्यंत कष्ट करून जीवनाचा गाडा हाकला. परंतु, आयुष्याने दिलेल्या वेदनांमुळे मरण आलेले बरे, असे वाटून मोठ्या बहिणीने अन्नत्याग करून धाकट्या बहिणीच्या कुशीत जीव सोडला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मृत नंदा दिगंबर भलगे (६०) आणि धाकटी बहीण कमला या दोघीही दिग्रस येथील हॉटेल व्यावसायिकाच्या मुली. दोन्ही बहिणींना जोडीदाराकडून असह्य छळ सोसावा लागत असल्याने त्यांनी मुलबाळ होऊ न देता संसार मोडला. वडील हयात असेपर्यंत त्यांना मोठा आधार होता. परंतु त्यांच्या जाण्यानंतर त्या एकाकी पडल्या. नातलगांनी आधार देण्याऐवजी त्यांना बेदखल केले. शेवटी धुणीभांडी करून त्या बहिणी दिग्रस येथे फुटपाथवर आयुष्य काढत होत्या. त्यांचा संघर्ष सामाजिक कार्यकर्ते अजिंक्य म्हात्रे, केतन रत्नपारखी, राजू भट, मिलिंद मोरे तसेच राजू जाधव हे पाहत होते. त्यांनी या दोन्ही बहिणींचे पालकत्व स्वीकारले.

हेही वाचा – जेईई मेन्स परीक्षेत घोळ? विद्यार्थ्याला एकाच ‘रोल नंबर’वर वेगवेगळे गुण

वेदनादायी अशा जीवनाला संपविण्याचा पक्का निर्धार करीत नंदाताईंनी अन्न त्यागले. दरम्यान, तिची प्रकृती खालावल्याने या मंडळींनी तिला ७ जुलै रोजी शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. मनोवैद्यक डॉ. श्रीकांत मेश्राम यांनी या दोन्ही बहिणींची माहिती नंददीप बेघर मनोरुग्ण निवारा केंद्राचे संचालक संदीप शिंदे यांना दिली. त्यानंतर शिंदे यांनी लगेचच त्यांना आपल्या केंद्रात दाखल केले. याठिकाणी तातडीने डॉ. प्रवीण राखुंडे यांनी तिची तपासणी केली. त्यानंतर तिला सलाईन चढविण्यात आले. अन्न तसेच औषधी ग्रहण न करण्याचा तिचा इरादा पक्का होता. त्यामुळेच ती मरणासन्न अवस्थेत पोहोचली आणि अखेर १८ जुलैच्या सकाळी ११ वाजता तिने अंतिम श्वास घेतला. तिच्या मृत्यूचा जबर आघात बसल्याने धाकटी बहीण कमला हिने तिचे शव कवटाळून घेतले. ती जिवंत असून तिच्या पापण्या आणि पोटाची हालचाल होत असल्याचे ती सतत म्हणत होती. शरीर क्षीण होईस्तोवर कमला रडत होती. अखेर मृत्यू झाल्याबाबत तिची समजूत काढली आणि तिच्या आग्रहापोटी दिग्रस येथे नेऊन नंदाताईंच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी दिग्रस येथील सामाजिक कार्यकर्त्यांसह ‘नंददीप’चे संदीप शिंदे, हरीश तांबेकर, नरेंद्र पवार, रमेश केळकर, निशांत सायरे उपस्थित होते.

हेही वाचा – लैंगिक छळाची तक्रार केली म्हणून नोकरीवरून काढले, मात्र उच्च न्यायालयाने…

एकमेकींचा आधार

नंदा आणि कमला या दोघी बहिणींना एकमेकींचाच आधार होता. सुखापेक्षा दुःखांच्या दिवसांचा सामना त्यांनी एकत्रितपणे केला. त्यामुळे नंदाचा असा करुण अंत झाल्याने धाकटी कमला एकाकी पडली आहे. आता सरतेशेवटी केवळ नंदाच्या आठवणींचा संग्रह तिच्याजवळ आहे. कविवर्य सुरेश भटांच्या कवितेतील ‘मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते’ या ओळींचा तंतोतंत प्रत्यय या दोन बहिणींच्या कहाणीतून येत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yavatmal the elder sister gave up food and died in the arms of the younger sister nrp 78 ssb
Show comments