दारव्हा मार्गावरील बोरी अरब येथील अडाण नदीवरील अपूर्ण पूल स्थानिक नागरिकांसह प्रवाशांना मरण यातना देत आहे. मंगळवारी सायंकाळी बांधकामाअभावी रखडलेल्या या पुलावरून पाणी वाहत असताना रस्ता पार करत असलेला एक जण वाहून गेला. मात्र नदी काठावर उभ्या असलेल्या तरुणाने प्रसंगावधान राखून पुरात उडी घेऊन वाहून जात असलेल्याचा जीव वाचविला.

तीन आठवड्यांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक नदी, नाले दुथडी भरून वाहत आहेत. मात्र मानवी चुकांमुळे यवतमाळ-दारव्हा मार्गावरील वाहतूक थोड्याही पावसाने बंद होत आहे. जुना पूल पाडून येथे नव्याने पूल बांधण्यात येत आहे. पावसाळ्यापूर्वी हे काम होणे अपेक्षित असताना ते रखडले. त्यामुळे कंत्राटदाराने येथे तात्पुरता पूल बांधला. मात्र यावर्षी सततच्या पावसामुळे हा पूल कायम पाण्याखाली असतो. त्यामुळे यवतमाळ-दारव्हा या राज्यमार्गावरील वाहतूक बंद होते. मंगळवारीसुद्धा संततधार पावसामुळे या पुलावरून पाणी वाहत होते.

मंगळवारी बोरी अरब येथे आठवडी बाजार भरतो. त्यामुळे परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात येतात. काल बाजार करून बोरी बुद्रुक येथील तिघेजण पुलावरील पाण्यातून पलीकडे निघाले. प्रवाहाने त्यातील विजय पवने याचा हात सुटला. सोबतच्या दोघांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र तो वाहून गेला. ही बाब नदीकाठावर उभ्या असलेल्या धनराज वसंत कोल्हे, रा. हातगाव, ता. दारव्हा येथील तरुणाने बघितली. त्याने कोणताही विचार न करता धावत जाऊन पुरात उडी घेतली व विजय पवने याला काठावर आणले. धनराज कोल्हे याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Story img Loader