नागपूर : यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यातून वाघाने तब्बल ५०० किलोमीटरचे स्थलांतर करत सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला आहे. यापूर्वीदेखील या अभयारण्यातून दोनदा वाघाने स्थलांतर केले असून गेल्या सहा वर्षात तीन वाघांचे स्थलांतर समोर आले आहे. स्थलांतरणादरम्यान वाघ एका दिवसात ५० ते १०० किलोमीटरचे कापत असल्याचेही लक्षात आले. वाघांच्या स्थलांतरणाचे प्रमाण वाढत असल्याने संवर्धन पद्धतीवर भर देण्याची गरज व्यक्त होत आहे.
टिपेश्वर अभयारण्यात २०२० साली जन्मलेला हा वाघ २०२२ मध्ये आईपासून वेगळा झाला. स्वत:चे अधिकारक्षेत्र शोधत या वाघाने तब्बल ५०० किलोमीटरचा प्रवास केला. सध्या सोलापूर ते धाराशिवच्या दरम्यानच्या वनक्षेत्रात त्याचे वास्तव्य आहे. टिपेश्वर अभयारण्यात मे २०२३ मध्ये कॅमेरा ट्रॅपमध्ये या वाघाचे शेवटचे छायाचित्र आले. त्यानंतर धाराशिवमध्ये बिबट्यासाठी लावलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये या वाघाचे छायाचित्र आले. तिथल्या अधिकाऱ्यांनी डेहरादून येथील भारतीय वन्यजीव संस्थेला छायाचित्र पाठवल्यानंतर तो टिपेश्वरचा वाघ असल्याचे स्पष्ट झाले, असे विभागीय वनाधिकारी उत्तम फड यांनी सांगितले. तर सध्या हा वाघ सोलापूर ते धाराशिव यादरम्यान वास्तव्यास असल्याचे सोलापूरचे उपवनसंरक्षक कुशाग्र पाठक यांनी सांगितले. दरम्यान, टिपेश्वरच्या वाघाचे होणारे स्थलांतर आता अभ्यासाचा विषय झाला आहे. सुमारे १४८ किलोमीटर क्षेत्र असलेल्या टिपेश्वर अभयारण्यात १२ ते १५ वाघ राहतील एवढी क्षमता आहे. सध्याच्या स्थितीत २०२२च्या व्याघ्रगणनेनुसार या अभयारण्यात सुमारे २० वाघ आहेत. लगतच्या पैनगंगा अभयारण्याची क्षमता देखील कमी असल्याने या अभयारण्यातील वाघांनी मध्यभारतात मोर्चा वळवला आहे.
वाघांच्या स्थलांतरणाचे प्रमाण वाढत आहे. यातील काही स्थलांतर समोर येत आहेत, तर काही समोर आलेले नाही. धाराशिव जिल्ह्यातील येडशी-रामलिंगम मध्ये पहिल्यांदाच वाघाची नोंद झाली. महिनाभरापूर्वी कारंजा-सोहोळ या गवताळ प्रदेशात वाघ दिसून आला. तर तीन ते चार महिन्यांपूर्वी पोहरा-मालखेड येथेही व्याघ्रदर्शन झाले. वाघांच्या स्थलांतरणामुळे कॉरीडॉरची संलग्नता दिसून येत असली तरीही संवर्धन पद्धतीवर आता गांभीर्याने विचार करावा लागणार आहे.
यादव तरटे पाटील, माजी सदस्य, राज्य वन्यजीव मंडळ
हेही वाचा : नियोजित वराला आक्षेपार्ह छायाचित्रे पाठवून तरूणीची केली बदनामी
-जून २०१९ मध्ये टिपेश्वर अभयारण्यातून ‘रेडिओ कॉलर’ केलेला ‘सी-१’ या वाघाने आतापर्यंतचे सर्वाधिक ३,२०० किलोमीटरपेक्षा अधिक प्रवास केला. यादरम्यान मराठवाड्यातील अजिंठा-वेरुळ, तेलंगणातील काही जिल्हे असा प्रवास केला व नंतर तो ज्ञानगंगा अभयारण्यात आला.
-जून २०२१ मध्ये टिपेश्वर अभयारण्यातून ‘वीर’ नावाच्या वाघाने याच जिल्ह्यात पुसद तालुक्यात व नंतर दुसरीकडे स्थलांतर केले. सुमारे दोन वर्षानंतर तो याच अभयारण्यात परतला. ‘रेडिओ कॉलर’ नसल्याने त्याचा प्रवास किती किलोमीटरचा ते कळू शकले नाही.
-मे २०२३ नंतर ‘टी२२’या वाघिणीच्या पोटी जन्मलेला या वाघाने आतापर्यंत तब्बल ५०० किलोमीटरचा प्रवास करत सोलापूर जिल्ह्यात स्थलांतर केले.