यवतमाळ : जिल्ह्यात गेल्या दहा दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असून अलिकडच्या काही वर्षांतील इतके दिवस मुक्काम ठोकणारी पावसाची ही पहिलीच ‘झड’ ठरली आहे. आज सकाळी थोडी उघडीप दिल्यानंतर दुपारपासून पुन्हा पावसाची रिपरिप सुरू झाली. सततच्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून, शेतात पाणी साचल्याने पिकांचेही नुकसान होत आहे.
गेल्या २४ तासांत १८ मिमी पाऊस कोळसला असून जिल्ह्यात आतापर्यंत ५८५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, मारेगाव तालुक्यात चिंचमंडळ येथे आज सकाळी शेतकऱ्याचा नाल्यात वाहून गेल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. मेघश्याम नारायण वासाडे (५८, रा. चिंचमंडळ) असे मृताचे नाव आहे. मारेगाव तालुक्यातील दापोरा फाट्यासमोर असलेल्या उपाश्या पुलाच्या शेजारून पशुधन घेवून शेतात जात असताना शेतकरी मेघश्याम पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. या घटनेत पशुधन सुखरूप बचावले, मात्र शेतकऱ्याचा मृत्यू झाला. दुपारी उशिरा त्यांचा मृतदेह आढळला. या घटनेने चिंचमंडळ गावात शोककळा पसरली आहे.
हेही वाचा – अमरावती : परकीय चलनाचे आमिष देत हाती दिले रद्दी कागद…
गेल्या १० दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने सर्वत्र नदी, नाले ओसंडून वाहत आहेत. जिल्ह्यातील वर्धा, पैनगंगा, अडाण, अरूणावती, बेंबळा, खुनी आदी मोठ्या नद्या दुथडी भरून वाहत आहे. काही गावांमध्ये या नदीवरील पुलाहून पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद आहे. जिल्ह्यात रविवारी तीन महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. या पावसाने आतापर्यंत १० हजारपेक्षा अधिक हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शंभरांवर अधिक घरांची पडझड झाली असून आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाला आहे. पालकमंत्री संजय राठोड यांनी प्रशासनाकडून जिल्ह्यातील पूर परिस्थितीचा आढावा घेवून नुकसानग्रस्त भागात पंचनामे करून मदतकार्य पोहोचविण्याच्या सूचना प्रशासनास केल्या.
मारेगाव तालुक्यात पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढळला
आज सर्वत्र जागतिक व्याघ्र दिन साजरा होत असताना मारेगाव तालुक्यातील बोटोणी जंगल परिसरातील पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढळला. ही घटना आज सोमवारी सकाळी बोटोणी नजीक चिंचोणी येथील रिठाच्या मारोती मंदिराजवळ असलेल्या नाल्याशेजारी उघडकीस आली. वन विभागाच्या चौकीदारास हा वाघ मृतावस्थेत आढळला.
बोटोणी परिसर जंगलाने व्यापलेला आहे. हा पट्टेदार वाघ फिरत या परिसरात आला असण्याची शक्यता आहे. वन विभागाच्या ट्रॅप कॅमेरातही हा वाघ निदर्शनास आला होता. तेव्हा त्याच्या मानेगलगत जखम असल्याचे आढळले होते. ही जखम चिघळून त्याला संसर्ग झाला असावा, तसेच सततच्या पावसामुळे नाल्यास पूर असल्याने वाघाला तेथून बाहेर पडता आले नसण्याची शक्यता आहे. त्यामुळे अन्नावाचून त्याचा मृत्यू झाला असण्याची शक्यता वनविभागाने वर्तवली आहे. हा वाघ दोन दिवसांपूर्वी मृत्यूमुखी पडल्याने घटनास्थळी दुर्गंधी पसरली होती. वनविभागाने मृत वाघाचा पंचनामा केला आहे. शवविच्छेदन अहवालानंतरच या वाघाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे स्पष्ट होणार आहे. या घटनेने बोटोणी परिसरात खळबळ उडाली आहे.