यवतमाळ : गेल्या १२ दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने सर्वत्र रस्त्यांची चाळण झाली आहे. डांबरी रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडून त्यात पाणी साचत आहे. नगर परिषदेच्या अखत्यारित असलेल्या या रस्त्यांवर अपघात घडत आहेत. या खड्ड्यांकडे नगर परिषदेचे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी दारव्हा मार्गावर दर्डा नगर रेल्वे क्रॉसिंगजवळील खड्ड्यांत मासे सोडून अनोखे निषेध आंदोलन केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सर्वोच्च न्यायालयाने २६ जुलै २०२१ ला राज्य महामार्गापासून ५०० मीटर अंतरावर मद्यविक्री दुकानांना परवाना देणे बंद करा, असे निर्देश दिले होते. यवतमाळ ते दारव्हा हा राज्य महामार्ग असून मद्यविक्री दुकानाचे परवाने धोक्यात आले होते. म्हणून मद्यविक्री दुकानाला संरक्षण देण्यासाठी नगर परिषदेच्या तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांनी प्रतिज्ञापत्र सादर करून रस्त्याची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी स्वीकारली व शहरातील राज्यमार्ग नगरपरिषद हद्दीमध्ये समाविष्ट करून घेतले. नगरपरिषदेने मद्यविक्री दुकानाची सुरक्षा तर केली, मात्र रस्त्याची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी पार न पाडल्यामुळे शेकडो वाहन चालकांचे जीव धोक्यात घातले, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.

हेही वाचा…‘‘आपले सरकार व गृहमंत्री असतानाही…” अमोल मिटकरींचा संताप; पोलीस ठाण्यात ठिय्या

पावसाळ्याचे दिवस असताना दर्डा नगर जवळील रेल्वे क्रॉसिंगजवळ तलावसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या रस्त्यावरून प्रचंड वाहतूक आहे. खड्डे पाण्याने भरल्यामुळे त्यांच्या खोलीचा वाहन चालकांना अंदाज येत नाही. त्यामुळे अनेकांचे अपघात झाले आहेत. नगरपरिषदेचे याकडे लक्ष वेधण्याकरता वंचितचे जिल्हाध्यक्ष डॉ. नीरज वाघमारे यांनी पावसाळी पाण्याच्या खड्ड्यांत मासे सोडून नगर परिषदेच्या दुर्लक्षित धोरणाचा निषेध नोंदवला.

या निषेध आंदोलनात वंचितचे महासचिव शिवदास कांबळे, धम्मवती वासनिक, आकाश वाणी, पुष्पा शिरसाठ, सरला चचाने, आदींसह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.

हेही वाचा…भाजपा नेते आशीष देशमुख यांचा महायुतीला घरचा आहेर, म्हणाले “केदार यांना वळसे पाटील पाठीशी घालत आहे.”

पावसाळ्यात ‘मजीप्रा’कडून खोदकाम

शहरातील अंतर्गत रस्त्यांची कामे मार्च महिन्यात मंजूर होऊनही ती कामे ऐन पावसाळ्यात सुरू करण्यात आली. वर्दळीच्या दत्त चौकात रस्त्याच्या कडेने नाली बांधकाम, मधातून जीवन प्राधिकरणाकडून पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. या खोदकामांमुळे दत्त चौकात चिखल होवून पाणी साचले आहे. प्रशासनाने हा मार्ग अनेक ठिकाणी बंद केला आहे. याच परिसरात अनेक शाळा, महाविद्यालये, दवाखाने, बाजारपेठ असल्याने नागरिकांसह, विद्यार्थी, रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. ऐन पावसाळ्यात ही कामे करण्यामागे कंत्राटदार, प्रशासनाचा हेतू काय असावा, याबाबत शंका उपस्थित होत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yavatmal vanchit bahujan aghadi protests pothole neglect with fish release amid continuous rains nrp 78 psg