नितीन पखाले
यवतमाळ: मतदारसंघ पुनर्रचनेनंतर २००८ मध्ये यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आला. त्यापूर्वी यवतमाळ आणि वाशीम असे दोन स्वतंत्र लोकसभा मतदारसंघ होते. यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघातील एप्रिल २०२४ मधील चौथी निवडणूक आहे. यापूर्वीच्या तिन्ही निवडणुकीत शिवसेना आणि काँग्रेस अशी लढत झाली. त्यात शिवेसेनेच्या भावना गवळी कायम विजयी झाल्या. तिन्ही वेळेस बसपा आणि वंचितसारख्या पक्षांनी काँग्रेसची विजयाची वाट बिकट केल्याचे दिसते.
यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात शिवसेना व काँग्रेस अशी पारंपरिक लढत व्हायची. यावेळी मात्र चित्र जरा वेगळे आहे. या मतदारसंघाच्या निर्मितीनंतर प्रथमच काँग्रेस या निवडणुकीत प्रत्यक्ष लढणार नाही. तर शिवसेना (शिंदे गट) विरूद्ध शिवसेना (उबाठा) अशी एकाच घरातून वेगळे झालेल्या उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. मात्र या दोन्ही पक्षांकडून अद्याप उमेदवाराची अधिकृत घोषणा झालेली नाही. भावना गवळी यवतमाळ-वाशीम लोकसभा अस्तित्वात येण्यापूर्वी वाशीम लोकसभा मतदारसंघाच्याही खासदार राहिल्या आहेत. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात त्या २००९, २०१४ आणि २०१९ अशा सलग तीन वेळा निवडणूक जिंकल्या आहेत. पहिल्या दोन निवडणुकीत बसपा आणि तिसऱ्यावेळी वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार भावना गवळी यांच्यासाठी तारणहार ठरला. २००९ मध्ये भावना गवळी यांनी काँग्रेसचे हरिभाऊ राठोड यांचा ५६ हजार ९५१ मतांनी पराभव केला होता. त्यावेळी बसपाकडून दिलीप एडतकर हे रिंगणात होते. त्यांनी ६२ हजार ७८१ मते घेतली. ही मते पारंपरिकपणे काँग्रेसच्या बाजूने असतात. मात्र बसपाने निवडणूक लढविल्याने त्याचा फायदा तेव्हाच्या भाजप-शिवसेना युतीला झाला आणि काँग्रेसचे हरिभाऊ राठोड यांचा पराभव होऊन शिवसेनेच्या भावना गवळी विजयी झाल्या.
हेही वाचा >>>मेळघाटात कारची दुचाकीला धडक, चार जण ठार
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवार म्हणून भावना गवळी रिंगणात होत्या. काँग्रेसकडून ज्येष्ठ नेते शिवाजीराव मोघे रिंगणात होते. याही निवडणुकीत भावना गवळी यांनी शिवाजीराव मोघे यांचा तब्बल ९३ हजार ८१६ मतांनी पराभव केला. या निवडणुकीत बसपाचे बळीराम राठोड यांना ४८ हजार ९८१ मते पडली. यावेळीसुद्धा बसपाने काँग्रेसचे मताधिक्क्य कमी केले. २०१९च्या निवडणुकीत भावना गवळी तिसऱ्यांदा भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवार होत्या. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे रिंगणात होते. यावेळी भावना गवळी यांनी एक लाख १७ हजार ९३९ इतक्या प्रचंड मतांनी माणिकराव ठाकरे यांचा पराभव केला होता. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे प्रवीण पवार यांना ९४ हजार २२८ मते पडली. यावेळीसुद्धा वंचितमुळे काँग्रेसला फटका बसला.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत बसपा, वंचित बहुजन आघाडी हे कॅडर आधारित पक्ष काँग्रेससाठी नेहमीच मारक ठरले आहेत. याची पुनरावृत्ती २०२४ मध्येही होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. महाविकास आघाडीत सहभागी होण्याबाबत वंचित बहुजन आघाडीची भूमिका अद्यापही तळय़ात मळय़ात आहे. या संदर्भात वंचित बहुजन आघाडीचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष डॉ. निरज वाघमारे यांना विचारणा केली असता, महाविकास आघाडीत सहभागी झालो तर त्यांच्यासोबत राहू. महाविकास आघाडीत सहभागी न झाल्यास यवतमाळ-वाशीम मतदारसंघात पक्षाचा स्वतंत्र उमेदवार देणार आहोत. त्याची संपूर्ण तयारी झाली आहे, असे वाघामारे यांनी सांगितले. वंचित पक्ष यावेळी निवडणुकीच्या रिंगणात उतरला तर त्याचा फटका पुन्हा महाविकास आघाडीला बसून महायुतीला त्याचा फायदा होण्याची शक्यताच अधिक आहे.