यवतमाळ – जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला आहे. यवतमाळ-वाशिममध्ये कोणत्याही परिस्थितीत शिवसेना उमेदवारास निवडून आणण्याचा चंग पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बांधला आहे. मात्र जिल्ह्यात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) अद्यापही निष्क्रीय अवस्थेत आहे. उद्धव ठाकरे यांच्या प्रयत्नांना मित्रपक्षच सहकार्य करत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या विजयासाठी उद्धव ठाकरेंच्या चाललेल्या प्रयत्नांना मित्र पक्षांची साथ मिळते की नाही, अशी शंका व्यक्त करण्यात येऊ लागली आहे.
जिल्ह्यात सत्ताधारी महायुती आणि विरोधक महाविकास आघाडीत थेट लढत होणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीने अद्यापही आपला उमेदवार जाहीर केला नाही. मात्र महाविकास आघाडीचे शिलेदार, शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जिल्ह्यात तीन सभा घेवून हॅटट्रिक साधली. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या शांत राहण्याच्या भूमिकेमुळे उद्धव ठाकरेंच्या या सभा महाविकास आघाडीला कितपत उपयोगी ठरतील, याबाबत चर्चा रंगली आहे.
हेही वाचा – वर्ध्यात महाविकास आघाडीत त्रांगडे
यवतमाळ जिल्हा हा भाजप आणि शिवसेनेला राजकीय दृष्ट्या लाभकारी असल्याचा समज आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हेसुद्धा यवतमाळ जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीपूर्वी एकतरी सभा घेतात. हा प्रकार २०१४ पासून सातत्याने सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी २८ फेब्रुवारीला यवतमाळ येथे सभेनिमित्त आले होते. त्यानंतर आठवडाभरातच भाजपचे कट्टर विरोधक व राज्यातील महाविकास आघाडीतील शिवसेना उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राळेगाव, पुसद व उमरखेड येथे जनसंवाद सभा घेतली. यवतमाळातून निवडणुकीचे रंणशिंग फुंकले तर हमखास यश मिळते, या श्रद्धेतून या दोन मोठ्या नेत्यांनी यवतमाळच्या भूमीत पाय ठेवल्याची चर्चा आहे. मात्र सध्या जिल्ह्यात महाविकास आघाडीत समन्वय नसल्याचे चित्र आहे. यवतमाळ-वाशिम आणि हिंगोली-उमरखेड लोकसभा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाच्या वाट्याला येणार आहेत. या मतदारसंघातील शिवसेना उमेदवाराची घोषणा झाली नसली तरी शिवसेनेने प्रचार सुरू केला. या प्रचारात महाविकास आघाडीत असूनही शिवसेना ठाकरे गट एकाकी असल्याचे दिसते.
हेही वाचा – बीडमध्ये मराठा ध्रुवीकरणाचा शरद पवारांचा प्रयोग
कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या यवतमाळातील काँग्रेस लोकसभेची निवडणूक असूनही एकदम शांत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेवेळी काँग्रेसकडून केंद्राच्या धोरणांचा निषेध होईल, अशी अपेक्षा होती. मात्र तेव्हासुद्धा शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनीच मोदी व केंद्र सरकारच्या निषेधाचे फलक झळकवले होते. काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार) हे दोन्ही पक्ष विरोधापासून अलिप्त होते. त्यामुळे जिल्ह्यात महाविकास आघाडी असूनही तिन्ही पक्षांत समन्वय नसून, उद्धव ठाकरे हेच भाजप विरोधात एकाकी लढा देत आहे.
हेही वाचा – पंकजा मुंडेंच्या प्रचाराचे पालकत्व धनंजय मुंडे यांच्याकडे
जिल्ह्यात महायुती महाविकास आघाडीपेक्षा अधिक राजकीय व संघटनदृष्ट्या अधिक सक्षम आहे. महायुतीचे सात आमदार जिल्ह्यात आहेत. अशा वेळी महाविकास आघाडीतील पक्षांनी संघटन दाखवून एकत्र लढा देणे गरजेचे आहे. मात्र असंख्य शकले होवूनही काँग्रेसमध्ये तसूभरही बदल झालेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) ही जिल्ह्यातून जवळपास हद्दपार झाली आहे. अशा वेळी निवडणुकीच्या या रणसंग्रामात विरोधकांची निष्क्रियता महायुतीच्या पथ्यावर पडण्याचीच शक्यता अधिक आहे.