वाशीम : यवतमाळ वाशीम लोकसभा मतदार संघात गतवेळच्या तुलनेत यावर्षी केवळ १.७८ टक्के मतांची वाढ नोंदविण्यात आली. मतदार संघात सरासरी ६४ टक्के मतदान झाले. निवडणुकीच्या रिंगणात सतरा उमेदवार असले तरी खरी लढत महायुती विरुध्द महाविकास आघाडी अशीच झाली. विधानसभा क्षेत्रानुसार विचार करता वाशीम जिल्हयातील दोन विधानसभा मतदार संघात भाजपचे वर्चस्‍व असल्यामुळे भाजपच्या गडात कुणाला लीड मिळणार ? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात वाढलेली मतांची टक्केवारी कुणाच्या पारडयात पडणार ? कुणाच्या विजयाची वाट सुकर करणार ? यावरही बरेचकाही अवलंबुन आहे. वाढीव मतदारांचा टक्का निर्णायक राहणार असून मतदारांच्या आकडेवारीचे फड रंगले असून आपलाच विजय निश्चित असल्याचे दावे, प्रतिदावे केली जात आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : नागपूर : शासकीय दंत महाविद्यालयात पदव्युत्तरच्या सर्वाधिक जागा

यवतमाळ वाशीम लोकसभा मतदार संघात विद्यमान खासदार भावना गवळीं तीन टर्मपासून विजयी पताका फडकावित आलेल्या आहेत. मात्र यावेळी त्यांना उमेदवार न देता राजश्री पाटील महाले यांना शिवसेना शिंदे गटाकडून महायुतीच्या उमेदवार म्हणून रिंगणात उतरविण्यात आले. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून शिवसेना ठाकरे गटाकडून संजय देशमुख होते. यासोबतच बसपाचे हरिभाऊ राठोड, वंचित पुरस्कृत समनक जनता पार्टीचे प्रा. राठोड यांच्यासह जवळपास सतरा उमेदवार लोकसभा निवडणुकीच्या आखाडयात होते. परंतु खरी लढत ही शिवसेना विरुध्द शिवसेना अशीच झाली. यवतमाळ वाशीम लोकसभा मतदार संघासाठी शुक्रवारी मतदान प्रक्रीया पार पडली. उन्हाचा पारा चढलेला असतांनाही ६२.८७ टक्के मतांची नोंद झाली. शहरी भागात मतांची टक्केवारी कमी असली तरी ग्रामीण भागात मात्र भरभरुन मतदान झाले. १९ लाख ४० हजार ९१६ मतदारांपैकी १२ लाख २० हजार १८९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.मागील लोकसभा निवडुकीत ६१.३१ टक्के होती. मागील निवडणुकीच्या तुलनेत या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढला आहे. गतवेळच्या तुलनेत ही निवडणुक चुरसीची झाली असून वाढलेला मतांचा टक्का कुणाच्या पथ्यावर पडणार? कुणाचे गणित बिघडविणार याबाबतचा निर्णय लवकरच स्पष्ट होईल, मात्र सध्यातरी आकडेवारीवरुन जय पराजयाचे अंदाज बांधले जात आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yavatmal washim lok sabha election 2024 64 percent voter turnout recorded pbk 85 css