यवतमाळ: यवतमाळ- वाशीम लोकसभा मतदारसंघात सत्ताधारी महायुतीचे सात आमदार असतानाही शिंदे गटाच्या उमेदवार राजश्री हेमंत पाटील यांचा पराभव झाला. हा पराभव महायुतीच्या नेत्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री संजय राठोड, भाजपचे आमदार मदन येरावार या दिग्गजांची प्रतिष्ठा या पराभवाने धुळीस मिळाल्याची चर्चा आहे.
स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यवतमाळातून आचारसंहितेपूर्वी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारास सुरूवात केली होती. राजश्री हेमंत पाटील यांना ऐनवेळी उमेदवारी मिळाली. सोबतच त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या पक्षाच्या स्थानिक आमदारांवर सोपवली गेली. यवतमाळ- वाशीम लोकसभा मतदारसंघात यवतमाळ, राळेगाव, दिग्रस, पुसद, कारंजा आणि वाशीम या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. यातील यवतमाळमध्ये भाजपचे मदन येरावार, राळेगावमध्ये प्रा. अशोक उईके (भाजप), दिग्रसमध्ये संजय राठोड (शिवसेना शिंदे), पुसद येथे इंद्रनील नाईक (राकाँ अजित पवार), कारंजामध्ये भाजपचे दिवंगत राजेंद्र पाटणी हे आमदार होते, तर वाशीममध्ये भाजपचेच लखन मलिक हे आमदार आहेत. याशिवाय विधान परिषदेचे आमदार निलय नाईक (पुसद) हे भाजपचेच आहेत. या सर्व सत्ताधारी आमदारांवर महायुतीच्या उमेदवारास निवडून आणण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. ज्या सत्ताधारी आमदाराच्या मतदारसंघात उमेदवाराचे मताधिक्य कमी होईल, त्या आमदारास विधानसभा निवडणुकीत तिकीट देण्याबाबत विचार केला जाईल, असा सूचनावजा इशाराही देण्यात आला होता. निवडणूक काळात स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चार मतदारसंघात दौरा केला. एक दिवस मुक्काम केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेतल्या. तरीही यावेळी जनतेने सत्ताधारी भाजप, शिवसेना, राकाँला झिडकारल्याचे चित्र आहे.
हेही वाचा : यवतमाळ : ‘माहेरच्या ऋणाईतच राहील’, महायुतीच्या राजश्री पाटील यांचा विधानसभेपाठोपाठ लोकसभेतही पराभव
लोकसभा मतदारसंघात समाविष्ट सहाही विधानसभा मतदारसंघात महायुतीपेक्षा महाविकास आघाडीचे उमदेवार संजय देशमुख यांनी पुसद वगळता राळेगाव, दिग्रस, कारंजा, वाशीम, यवतमाळ या विधानसभा मतदारसंघातून मोठे मताधिक्य घेतले. संजय देशमुख यांना राजश्री पाटील यांच्यापेक्षा वाशीम विधानसभा मतदारसंघात ३९ हजार ७३९, कारंजा – २० हजार ९६२, राळेगाव – २४ हजार ५९७, यवतमाळ – २ हजार ५३८ तर दिग्रस विधानसभा मतदारसंघात आठ हजार ८६७ मतांची आघाडी आहे. केवळ पुसद विधानसभा मतदारसंघात राजश्री पाटील यांनी तीन हजार १९८ मतांची आघाडी घेतली.
हेही वाचा : गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा व गोंदिया विधानसभेत महायुती, तर अर्जुनी मोरगावमध्ये आघाडीला मताधिक्य
दिग्रस हा पालकमंत्री संजय राठोड यांचा मतदारसंघ आहे, तर राळेगाव भाजपचे आमदार, माजी आदिवासी विकासमंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांचा मतदारसंघ आहे. यवतमाळ जिल्ह्यातील राळेगावमध्ये संजय देशमुख यांनी घेतलेली मतांची आघाडी ही भाजपसाठी चिंतेचा आणि चिंतनाचा विषय आहे. वाशीम आणि कारंजा येथेही भाजपचे आमदार असल्याने तेथेही भाजपने आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे. राजश्री पाटील यांचा पराभव महायुतीच्या जिव्हारी लागणारा आहे. या मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाच्या विद्यमान खासदार असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऐनवेळी येथे राजश्री पाटील यांना उमेदवारी दिली. मात्र नागरिकांनी येथे महायुतीला नाकारले. भावना गवळी यांनाच येथे उमदेवारी दिली असती तर कदाचित चित्र वेगळे असते, अशी चर्चा आहे. सत्ताधारी पक्षाचे सात आमदार असून एकही आमदार महायुतीच्या उमदेवाराला मताधिक्य मिळवून देऊ शकले नसल्याने या सर्व आमदारांसाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे.